|Sunday, September 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बुर्ज खलिफानजिकच्या इमारतीत भीषण आग

बुर्ज खलिफानजिकच्या इमारतीत भीषण आग 

दुबई / वृत्तसंस्था

दुबईस्थित जगातील सर्वात ऊंच इमारत बुर्ज खलिफानजीक एका 60 मजली इमारतीला रविवारी भीषण आग लागली. निर्माणावस्थेत असलेल्या ‘दि ऍड्रेस रेसिडेन्स फाऊन्टेन व्हीयूस टॉवर्स’ या इमारतीत पहाटे 5.30 वाजता आगीची दुर्घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आगीच्या दुर्घटनेदरम्यान इमारतीत अडकलेल्या चार कामगारांपैकी तिघांची सुटका करण्यात बचाव पथकांना यश आले. तर काही वेळाच्या प्रयत्नानंतर चौथ्या  कामगाराचीही सुखरुप सुटका करण्यात आल्याची माहिती दुबई नागरी सुरक्षा आणि पोलिस दलाकडून देण्यात आली. आगीमुळे परिसरात पसरलेल्या प्रचंड धुरामुळे जगप्रसिद्ध बुर्ज खलिफाच्या दिशेने जाणारा मार्ग काही कालावधीकरिता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. ही इमारत विकासक ‘एम्मारच्या’ मालकीचे असल्याचे दुबईच्या अधिकृत माध्यम कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

घटनेची माहिती देताना बांधकाम सुरू असणाऱया या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील कार पार्किंमध्ये आगीने सर्वप्रथम पेट घेतला. यानंतर आगीचे लोण क्षणार्धात सातव्या मजल्यापर्यंत पसरल्याची माहिती मेजर जनरल रशीद थानी अल मतरौशी यांनी दिली. पाचव्या मजल्यावर साठवण्यात आलेल्या बांधकाम साहित्यामुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवत 5.45 मिनिटांनी घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाने दुपारी 12 वाजेपर्यंत आग विझवत परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याचेही त्यांनी सांगितले. बुर्ज खलिफा परिसरात आग लागल्याची ही पहिली घटना नसून यापूर्वी 2015 साली नजीकच्या इमारतीत घडलेल्या अग्निकाडांत 15 जणांचा अंत झाला होता.