|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रिफायनरीसाठी राजापुरातील 15 गावे नक्की!

रिफायनरीसाठी राजापुरातील 15 गावे नक्की! 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

सुमारे 2 लाख कोटी रुपये खर्च करुन जगातील सर्वात मोठी पेट्रोलियम रिफायनरी राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात उभारण्याचे शासनाने नक्की केल्याचे संकेत मिळत आहेत. 6 एप्रिल रोजी राजापूर तहसीलदार कार्यालयात 15 गावांचे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्याबरोबर अन्य लोकप्रतिनिधींची एक बैठक जिल्हाधिकाऱयांनी बोलावली आहे. या बैठकीत 15 हजार एकर जमिनी संपादित करण्यात येणार असून काही लोकांचे विस्थापन करावे लागल्यास सुंदर असे पर्यायी गाव निर्माण करुन देण्याची ग्वाही देण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी लोकशाही दिनानंतरच्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब बेलदार हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. जिल्हाधिकाऱयांनी सांगितले की, राजापूर तहसीलदार कार्यालयात 6 एप्रिल रोजी एक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला 15 गावांचे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, अन्य लोकप्रतिनिधी यांना बोलावण्यात येणार आहे. या परिसरातील 15 हजार हेक्टर जमिन संपादित करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले, कमीत-कमी विस्थापन व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे. परंतु ज्या लोकांचे विस्थापन करावे लागेल, त्यांच्यासाठी आदर्श विस्थापित गाव तयार करण्यात येईल. तेथे पाणी, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य अशा सर्वच सुविधांची उत्तम योजना करण्यात येईल. या लोकांना जास्तीत-जास्त भरपाई, त्याचबरोबर अन्य सुविधा मिळाव्यात म्हणून आमचे विशेष प्रयत्न राहतील. आदर्श गाव निर्मितीसाठी माझे व्यक्तिगत लक्ष राहील.

15 हजार एकर जमिनीपैकी 500 एकर जमीन हरित पट्टा म्हणून राखीव करण्यात येणार आहे. ग्रीन रिफायनरी म्हणून सर्वांपुढे येईल. या प्रकल्पासाठी 2 लाख कोटी रुपये एवढी गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे जगातील सर्वात मोठी रिफायनरी बनण्याचा मान नाणार, कुंभवडे परिसराला मिळणार आहे. यासाठी लोकांनी सहकार्य करावे, म्हणून आवाहन करण्यात येणार आहे. 6 एप्रिल रोजी बैठक किती वाजता घ्यावी, ते अद्याप नक्की झालेले नाही.

ही आहेत 15 गावे

प्रस्तावित रिफायनरीसाठी राजापूर तालुक्यातील कारशिंगेवाडी, उपळे, तारळ, चौके, दत्तवाडी, साखर, पडवे, नाणार, पालेकरवाडी, गोठीवरे, पात्रादेवी, कारिवळे, विल्ये, सागवे, वाडापाल्ये अशी 15 गावे निवडण्यात आली आहेत. या गावातील 15 हजार एकर जमिनी संपादित होणार असून कमीत-कमी विस्थापनाची ग्वाही प्रशासनाने दिली असली तरी स्वतंत्र गाव वसवण्याएवढे विस्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related posts: