|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कृष्णा नळपाणी योजना दुरूस्तीसाठी मंजूर निधी परत द्या

कृष्णा नळपाणी योजना दुरूस्तीसाठी मंजूर निधी परत द्या 

प्रतिनिधी / इचलकरंजी

इचलकरंजी शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी वारणा योजना मंजुर झाल्यामुळे शासनाने कृष्णा नळ पाणी दुरूस्तीसाठीची मंजुर योजना रद्द केली आहे. तसेच यापुर्वी दिलेला निधीही परत करावा असे शासनाने नगरपलिकेस कळवले आहे. पण कृष्णा योजनेला वारंवार लागत असलेली गळती व उपसा केंद्रावर असणाऱया पंपाची कमी झालेली क्षमता या सर्वांचा विचार करून राज्य नगरोत्थान योजनेचा 17 कोटीचा निधी पालिकेला परत मिळावा अशी मागणी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना निवेदनद्वारे केली आहे.

पंचगंगा नदिच्या प्रदुषित पाणीपुरवठयाला पर्यायी योजना म्हणून 2001 साली कृष्णा नळपाणी योजना अस्तित्वात आली. सध्या मजरेवाडी येथे असणाऱया या उपसा केंद्रावरील पंपाची क्षमता ही 60 टक्के इतकी कमी झाली आहे. तसेच या योजनेच्या पाईपलाइनला जागोजागी गळती लागण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे पंचगंगा व कृष्णा योजनेतून शहरास आवश्यक असणाऱया 54 दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा करता येत नाही. यासाठी 11.5 कीलोमीटर लांबीची पाईपलाईन बदलणे व पंपिंग मशिनरी बदलणेसाठीच्या 17.29 कोटी रूपयांच्या प्रस्तावाला तत्वत: मंजुरी मिळाली व प्रशासकीय मंजुरीनंतर शासनाच्या हिश्शाचा पहिला हप्ता पालिकेच्या खात्यात जमा आहे. पण सध्या शहरास केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत वारणा नदिवरून पाणी योजना मंजुर झाल्यामुळे कृष्णा नळपाणी दुरूस्तीसाठी मंजुर योजना रद्द करून तो निधी शासनाला परत करावा असे पलिकेला कळवले आहे. मंजुर योजनेपैकी केवळ 1.43 कोटी खर्चाच्या योजनेला सुधारीत मंजुरी मिळाली आहे. पाणीटंचाईच्या काळात कृष्णा नळपाणी योजनेच्या पाईपलाईन बदलणे व पंपिंग मशिनरी बसवणेचे काम न झालेस पाणीटंचाईची मोठी समस्या शहरात निर्माण होण्याची शक्यता आहे. यापुर्वीच्या योजनेत 11.5 किलोमिटरची जलवाहिनी बदलणे, मजरेवाडी येथील जॅकवेलचे 4 विद्युत पंप बदलणे व पंचगंगा जॅकवेलच्या चार कामांचा समावेश होता. पण यास पर्याय म्हणून मजरेवाडी येथील 2 विद्युतपंप बदलणे, पंचगंगा जॅकवेल येथील 2 कामे व 6 किलोमिटर पाईपलाईन बदलणे या कामासाठी 17 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. तरी नगरोत्थान योजनेतून प्राप्त झालेला निधी शासनाकडे परत न पाठवता कृष्णा नळपाणी पुरवठयाचे काम पुर्ण करणेसाठी 17 कोटीचा निधी पलिकेला परत मिळावा अशी मागणी नगराध्यक्षा  सौ. अलका स्वामी यांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा पक्षप्रतोद तानाजी पोवार, महिला व बालकल्याणच्या सभापती नेहा हुक्कीरे, उपसभापती सुजाता कोरे, आरोग्य सभापती सारिका धुत्रे उपस्थित होत्या.