|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रामनगरमध्ये भरदिवसा दोन घरे फोडली

रामनगरमध्ये भरदिवसा दोन घरे फोडली 

वार्ताहर/ रामनगर

येथील रामलिंग गल्लीतील दोन घरे भर दिवसा चोरटय़ांनी फोडून 4 लाखाच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याची नोंद रामनगर पोलीस स्थानकात झाली असून पोलीस रात्री उशिरापर्यंत तपास करत होते.

रामलिंग गल्लीतील पत्रकार निखिल असूकर यांच्या घरातील 2 लाख 50 हजाराचा ऐवज व रेणुका विनोद रोकडे यांच्या घरातील 1 लाख 40 हजाराच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरांनी लांबविली आहे.

निखिल असूकर हे सकाळी 10 च्या दरम्यान घराला कुलूप लावून पत्नी व मुलाला सावंतवाडीला पोचविण्यासाठी बेळगाव येथे गेले होते. त्यांनी पत्नीला व मुलाला बसमध्ये बसवून इतर कामे आटोपून ते रामनगरमध्ये दाखल झाले. दुपारी 3 वाजता घरी आले असता घराच्या समोरील दरवाजाची कडी चोरांनी तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

चोरटय़ांनी घरातील चार कपाटे फोडून सर्व कपडे इतर साहित्य विस्कटून टाकले होते. 35 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, 10 ग्रॅमच्या सोन्याच्या बांगडय़ा, 10 ग्रॅमचे डोल दोन नग व एक ग्रॅमचे पदक तसेच चांदीच्या दागिन्यांमध्ये दीड किलो ताम्हण, दीड किलो तांब्या, हळदीकुंकूचे पात्र 2 नग, चांदीची 4 नाणी गणपतीचे अलंकार यासह 12 हजार रुपये रोख रक्कम भर दिवसा चोरांनी लांबविली.

तसेच असूरकर यांच्या शेजारील रेणुका विनोद रोकडे यांच्या घरातही चोरीची घटना घडली असून 1 लाख 40 हजार रुपये सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरांनी डल्ला मारला. रेणुका या आपल्या मुलीसोबत दत्त मंदिराला गेल्या असता चोरांनी घरात कोणी नसल्याचे पाहून पाठीमागील दरवाजा फोडून घरात प्रवेश केला. सदर चोरी दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान झाली आहे. त्यांच्याही घरातील कपाटे फोडून चोरांनी सर्व साहित्य विस्कटून टाकले होते.

सदर घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच सीपीआय शिवाजी काळोजी यांच्या मार्गदर्शनाखाली इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी दोन्ही घरातील चोरीच्या ठिकाणांचे ठसे घेण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत तपास कार्य सुरू होते.

Related posts: