|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आंबेडकरांनी मागासलेल्यांना मुख्य प्रवाहात आणले

आंबेडकरांनी मागासलेल्यांना मुख्य प्रवाहात आणले 

 

प्रतिनिधी/ पणजी

“भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात अतिशय मागासलेला सामाजिक वर्ग जर कुठला असेल, तर तो अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती हा होता. त्याबरोबरच या काळातला महिलावर्गही अतिशय मागासलेला होता कारण स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांची परिस्थिती मागासलेल्या जमातींपेक्षाही वाईट होती. या मागासवर्गीय लोकांना तसेच महिलांना इतर वर्गांच्या अथवा महाजनांबरोबरच्या स्तरावर आणण्याचे व त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याचे काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. मागासलेल्यांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्याचे काम बाबासाहेब आंबेडकरांनी केले’’ असे उद्गार भारतरत्न भीमराव आंबेडकर यांच्याविषयी काढताना वसई, मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत ऍड. एन.डी. पाटील यांनी आंबेडकरांचा येथे झालेल्या कार्यक्रमात गौरव केला. इन्स्टिटय़ुट मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या परिषद सभागृहामध्ये काल सकाळी 11 वाजता दलित संघटनेतर्फे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 

या कार्यक्रमामध्ये ऍड. एन.डी. पाटील प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते. व्यासपीठावर याक्षणी दलित संघटनेचे पदाधिकारी व माजी सभापती शंभु भाऊ बांदेकर, बबनराव डिसोझा, विष्णू सखाराम काळकर, माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप, माजी शिक्षणमंत्री सौ. संगीता परब, सत्कारमूर्ती विष्णू राजाराम काळकर आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मोहन रानडे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

आंबेडकरांनी देशाला जगातील आदर्श राज्यघटना दिली

ऍड. एन. डी. पाटील पुढे म्हणाले की आंबेडकरांनी आपला धर्म बदलल्यामुळे अनेकांना ते रूचले नाही. त्यांनी धर्म बदलायला नको होता असे अनेकांनी त्यावेळी म्हटले होते. भारतातील सर्वात मोठा असणारा हिंदु धर्मही जाती-पातींनी पोखरलेला होता. काहींनी मुस्लीम व ख्रिश्चन धर्म स्वीकारला पण जातीची प्रथा नष्ट झाली नाही. भगवान गौतम बुध्दांचा व पुरोगामी विचार असलेला तसेच समता हा आधारबिंदु असलेला धर्म आंबेडकरांनी स्वीकारला व महाराष्ट्रातील तसेच इतर जवळच्या ठिकाणी असलेल्या दलित समाजाला एक नवी ओळख निर्माण करून दिली. भगवान गौतम बुध्द, संत कबीर ही बाबासाहेबांची दैवते होती. संत कबीरांनी हिंदु-मुस्लीम ऐक्याची शिकवण दिली आणि प्रभू श्रीरामाचा आदर्श सर्वांसमोर ठेवला. त्याचप्रमाणे ज्योतीबा फुले हेसुध्दा बाबासाहेबांच्या सामाजिक कार्यातले आदर्श होते. आंबेडकरांच्या जीवनामध्ये जसे महात्मा फुलेंचे योगदान आहे तसेच राजर्षी शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड महाराजांचेही योगदान आहे. त्यावेळच्या या फार मोठय़ा संस्थानिकांनी बाबासाहेबांना मदत केली. महाड येथे चवदार तळ्याचे आंदोलन आंबेडकरांनी केले. मंदीर प्रवेशाचे आंदोलन नाशिक येथे असलेल्या काळारा मंदीर येथे केले. या देशाला जगातील आदर्श राज्यघटना देण्याचे काम आंबेडकरांनी केले. लोकशाहीला संसदीय बनविण्याचे काम बाबासाहेबांनी केले असे ऍड. पाटील यांनी सांगितले. भारतात महात्मा गांधी, आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे लोकशाही टिकून राहिली असेही ऍड. पाटील यांनी बोलताना नमूद केले. णाजी शिक्षणमंत्री संगीता परब यांनी बोलताना जयंती नुसती साजरी करून उपयोग नाही तर त्या व्यक्तीपासून प्रेरणा घेणे आवश्यक असते असे सांगितले. त्याचबरोबर आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यातही कधी इतरांबरोबर तसेच दलितांशी भेदभाव केला नसल्याचे त्यांनी सांगताना त्यांच्या घरी त्यांच्या मुलांबरोबर खेळायला व अभ्यास करायला येणारा एक दलित मुलगा नंतर मोठा झाल्यावर पोलीस अधिकारी कसा बनला याविषयी सांगितले. बबनराव डिसोझा यांनी 1942 पासूनचा आपल्या स्वातंत्र्यलढय़ातील सहभाग, 1952 मध्ये आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्षातील सहभाग व त्यानंतरच्या घडामोडी व आठवणींना उजाळा दिला. मोहन रानडे यांनी बोलताना आंबेडकरांचा लढा चिरकाल टिकणारा असल्याचे सांगितले.

 

समाज समाधानी असावा हे आंबेडकरांना अभिप्रेत होते

माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांनी बोलताना आज राज्यघटना बदलावी अशी काहीजण मागणी करत असल्याचे सांगितले. या मागणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना खलप यांनी नक्की काय बदलावे ? लोकशाही बदलावी का ? समाजव्यवस्था बदलावी का ? हिटलरशाही आणावी का ? असे प्रश्न उपस्थित होत असल्याचे सांगून या वादग्रस्त मुद्याची हवाच काढून घेतली. आपला समाज समाधानी असावा हेच बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होते असे खलप म्हणाले. त्यामध्ये केवळ दलित समाजच नव्हे तर देशातील एकूण संपूर्ण समाज समाधानी असावा, अशी त्यांची इच्छा होती असे खलप यांनी नमूद केले.

 

विष्णू गाळकर ‘दलितमित्र’ पुरस्काराने सन्मानित 

प्रसिध्द समाज कार्यकर्ते विष्णू राजाराम गाळकर यांना मोहन रानडे यांच्याहस्ते ‘दलितमित्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पत्नी सुधा विष्णू गाळकर यांची खणा नारळाने ओटी भरण्यात आली. भुकेलेल्यांच्या अन्नदाता म्हणून प्रसिध्द असलेल्या गुणवंती शंभू कवळेकर यांचा माजी शिक्षणमंत्री संगीता परब यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. ‘वाटचाल’ या पुस्तिकेचे विमोचन यावेळी मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मान्यवरांची ओळख शंभू भाऊ बांदेकर यांनी आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत केली.

Related posts: