|Thursday, December 5, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा नको!

शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा नको! 

कणकवली : शिक्षक ज्ञानातून नव्या पिढीला आकार देतात. यातूनच भावी नागरिक बनत असतात. शिक्षकी हा पवित्र पेशा असून समाजाच्या सर्व स्तरातून शिक्षकांचा सन्मान राखला जावा. मुलांना चांगले शिक्षण देता यावे, यासाठी त्यांच्यावर कोणताही अशैक्षणिक कामाचा बोजा टाकू नये, असे प्रतिपादन सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांनी येथे राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा मेळाव्यात केले.

कणकवली शाखेतर्फे कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात आयोजित या मेळाव्याला जिल्हाभरातील शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सौ. साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याला सचिव चंद्रसेन पाताडे, विस्तार अधिकारी सुहास पाताडे, शिक्षक नेते भाई चव्हाण, चंद्रकांत अणावकर, शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष जगदिश गोगटे, नितीन कदम, लवू चव्हाण, रावजी परब, सचिन मदने, डी. बी. कदम, श्रीकृष्ण कांबळी, वृषाली सावंत, शाखा अध्यक्ष गिल्बर्ट फर्नांडिस, चैताली सावंत आदी उपस्थित होते. अनेक सेवानिवृत्त शिक्षक व महिला सेलच्या नूतन जिल्हाध्यक्षा वृषाली सावंत व कार्यकारिणीचा सन्मान करण्यात आला.

चव्हाण म्हणाले, शिक्षक समितीच्या आजवरच्या संघर्षाच्या वाटचालीत आम्ही नेहमीच शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी लढा उभारला. लोकशाही मार्गाने हा संघर्ष करताना शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शिक्षक बदली, पदोन्नती आदी शिक्षकांच्या समस्यांना प्राधान्य दिले आणि आंदोलने उभारली.

राणे म्हणाले, शिक्षकांनी संघटनवृत्ती जोपासली पाहिजे. आज परस्परांविषयी सहकार्याची भावना जोपासली जात असल्याने शिक्षक समितीतर्फे विविध सामाजिक उपक्रमही राबविले जात आहेत, याचा जिल्हाध्यक्ष म्हणून मला आनंद होत आहे. मात्र असेच संघटन वाढत जाते, तेव्हाच आपल्या अस्मितेसाठी लढा उभारू शकतो.

आनंद तांबे, नितीन कदम, माजी जिल्हाध्यक्ष राजन कोरगावकर, चंद्रसेन पाताडे आदींनी विचार व्यक्त केले. शिक्षक समितीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळालेल्या या शिबिराला डॉ. महेश मुंबळकर आणि जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य कर्मचाऱयांचे सहकार्य लाभले. याचवेळी विद्यार्थी दत्तक उपक्रमांतर्गत कणकवली तालुक्यातील बावीस केंद्रातील प्रत्येकी एका विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य, चप्पल, छत्री आणि अन्य साहित्याचे वितरण करून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. दत्तक विद्यार्थी, पालकांचा सत्कार करण्यात आला.

मेळाव्यात आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या प्रदीप मांजरेकर, जि. प. आदर्श शिक्षक पुरस्कार विजते विद्याधर तांबे, तहसीलदारपदी निवड झालेली डामरे गावची सुकन्या चैताली सावंत आदींचा सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱया शिक्षकांमध्ये विजय पाताडे, अजय सावंत, रश्मी आंगणे, विजय मेस्त्राr, कल्पना मलये, ऋतुजा चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मेळाव्याला संघटनेचे कुडाळ अध्यक्ष सचिन मदने, सावंतवाडी अध्यक्ष नारायण नाईक, पतपेढी संचालक राजेंद्र गाड, दिनकर तळवणेकर, नामदेव जांभवडेकर, ढवण आदी उपस्थित होते. प्रास्ताविक गिल्बर्ट फर्नांडिस यांनी, तर सूत्रसंचालन राजेश कदम, रश्मी आंगणे यांनी केले. आभार संतोष कुडाळकर यांनी मानले.

Related posts: