|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळले

स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळले 

साटेली-भेडशी : प्रथम दोडामार्ग तालुक्यात व आता बांदा परिसरात माकडतापाचे रुग्ण सापडत असतानाच दोडामार्ग तालुक्यात स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे दोन्ही रुग्ण स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऐवाळे यांनी स्पष्ट केले आहे.

 दोडामार्ग तालुक्यात माकडतापाचे एकूण 58, तर बांदा परिसरात 94 रुग्ण सापडले. दोडामार्ग तालुक्यात माकडतापाच्या रोगावर आळा घालणे प्रशासकीय यंत्रणेला शक्य झाले. गेल्या दोन महिन्यांत तालुक्यात माकडतापाचा नव्याने रुग्ण सापडलेला नाही. मात्र बांदा परिसरात माकडतापाचे प्रमाण वाढतच चालले आहे. या पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्यात स्वाईन प्लूचे दोन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोनावल येथील रंजना अशोक चोरलेकर (42) व घोटगेवाडीतील प्रथमेश प्रभाकर सातार्डेकर (10) अशी या दोघा रुग्णांची नावे आहेत.

 माकडताप आणि स्वाईन फ्लूच्या लक्षणांमध्ये बराच वेगळेपणा आहे. स्वाईन फ्लूमध्ये गळय़ात खवखवणे, त्यात वाढ होत राहणे, रक्त पडणे, धाप लागणे अशी लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे आढळल्यास रुग्णांनी ताबडतोब दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय किंवा साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून घ्यावेत. जेणेकरून या साथीवर ताबडतोब आळा घालण्यात मदत होईल, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

 दोडामार्ग तालुक्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण प्रथमच आढळले आहेत. प्रथमेश प्रभाकर सातार्डेकर याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातून त्याला बांबोळी येथे हलविण्यात आले आहे.

                  माकडताप तपासणीतून स्वाईन फ्लूचे रुग्ण

 दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात माकडतापाच्या संशयित रुग्णांची तपासणी केली जाते. गोवा राज्यातील मणिपाल येथील माकडताप तपासणीसाठीची टीम कार्यरत आहे. गेल्या एक वर्षापासून माकडतापाचे रुग्ण तपासले जात आहेत. आठ दिवसांपूर्वी माकडतापाच्या संशयावरून प्रथमेश सातार्डेकर व रंजना चोरलेकर यांच्या रक्ताची तपासणी गोवा येथील मणिपाल रुग्णालयात करण्यात आली. त्यात हे दोन्ही रुग्ण स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आढळले.

 स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य आजार आहे. रुग्णांनी याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. खोकला, बोलणे, लाळ अशा विविध माध्यमांतून हा रोग पसरू शकतो. याबाबतची काळजी घेण्यात यावी तसेच स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यास ताबडतोब दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधावा, असे आवाहन दोडामार्ग तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ऐवाळे यांनी केले आहे.

Related posts: