|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शिवसेना सोडल्यानंतर भाजपप्रेम का नाही दिसले?

शिवसेना सोडल्यानंतर भाजपप्रेम का नाही दिसले? 

मालवण : भाजप म्हणजे मेलेली पार्टी म्हणून टीका करणारे नारायण राणे आता पक्षात येण्यासाठी धडपडत आहेत. ते पक्षापासून दूर असलेलेच चांगले आहेत. ‘दुरून डोंगर साजरे’ या म्हणीप्रमाणे नारायण राणे यांना पक्षापासून लांबच ठेवणे योग्य आहे. त्यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांचे दुर्गुण दिसून येतील. शिवसेना सोडल्यानंतर राणे यांनी भाजपमध्ये का प्रवेश केला नाही? राणे यांचे भाजपवरील प्रेम म्हणजे पुतनामावशीचे आहे, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी मालवणात केली.

भाजपा तालुका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जठार बोलत होते. दहा वर्षांपूर्वी राणेंनी शिवसेना सोडली. त्यावेळी अडचणीत असलेल्या भाजपला सावरण्यासाठी का पुढाकार घेतला नाही? मी माझ्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर सिंधुदुर्गात भाजप वाढविली आहे. आता केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने राणेंचे भाजपवर प्रेम उफाळून आले आहे. राणेंना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा अधिकार वरिष्ठ पातळीवर आहे. मात्र, माझ्याशी एकाही नेत्याने आजपर्यंत राणेंच्या प्रवेशाबद्दल चर्चा केलेली नाही. ते ज्यावेळी चर्चा करतील त्यावेळी मी माझी भूमिका स्पष्ट करेन, असेही जठार म्हणाले.

मालवणातील अपयशातून यश मिळवू

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मालवण तालुक्यात आलेल्या अपयशातून आम्ही खचून जाणारे नाही. संकटसमयी जो साथ करतो तोच खरा मित्र असतो. पक्षाच्या अडचणीवेळी पक्षाला साथ करणारे कार्यकर्ते आमच्यासाठी महत्वाचे आहेत. त्यांच्यासाठी पक्षाकडून योग्य ती साथ उभी केली जाईल, असेही जठार यांनी स्पष्ट केले.

‘त्या’ विषयाची चौकशी करू

मालवण तालुक्यातील आठ हजार रेशनकार्डधारक धान्यपासून वंचित राहणार असल्याच्या विषयाची माहिती घेण्यात येईल. अन्नसुरक्षा कायद्यात सर्वच कार्डधारक बसण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. मालवण तालुक्यातील प्रकरणी तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असेही जठार म्हणाले. मालवणातील पाणीटंचाईच्या सर्व प्रस्तावांना मान्यता देण्यासाठी जिल्हाधिकाऱयांची भेट घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related posts: