|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘चित्रांच्या गोष्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन

‘चित्रांच्या गोष्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन 

प्रतिनिधी/ पणजी

 पर्यावरण प्रेमी राजेंद्र केरकर व लोक साहित्यिक पौर्णिमा केरकर यांची मुलगी समृद्धी केरकर हिच्या ‘चित्रांच्या गोष्टी’ या तिसऱया पुस्तकाचे प्रकाशन कला व संस्कृती भवनमध्ये झाले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून पत्रकार सचिन परब व गोमंतकीय ज्येष्ठ कवयित्री लीना पेडणेकर या खास अतिथी म्हणून उपस्थित होत्या. समृद्धीचे या आगोदर ‘निरझर’ हा काव्यसंग्रह व ‘अपृप वसुंधरेचे’ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

  समृद्धी केरकर हिने शाळेत न जाता स्वतःच्या विचारसरणीवर व निसर्गाच्या सानिध्यान राहून तीन पुस्तके लिहिली आहेत. चित्रांच्या गोष्टी हे पुस्तक तिने आपल्याला पडणाऱया विविध प्रश्नाची उत्तरे शोधताना लिहिलेले आहे. तिने सुरेख अशा कथांतून या पुस्तकाची निर्मिती केली आहे. निर्मळ दृष्टिकोण आई-वडिलांकडून मिळालेल्या शिकवणीच्या आधारे तिने अवघ्या वयात अशी ज्ञानसंपदा मिळविली आहे. समृद्धीच्या प्रत्येक गोष्टीत निर्सग लपलेला आहे. आपल्याला विचार करायला लावणार अशा या छानशा गोष्टी आहेत, असे सचिन परब यांनी समृद्धीचे कौतुक करताना सांगितले.

 आपण आपल्या मुलांवर दबाव न आणता त्यांना त्यांच्या आवडीनुसार काम करायला दिले पाहीजे. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना वेळ देणे गरजेचे आहे. सम़ृद्धीने तीन पुस्तकांची निर्मिती केली आहे. याचे श्रेय तिच्या आई-वडिलांना जाते. त्यांनी तिला वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने तिला हे शक्य झाले आहे. आताची पिढी खूप हुशार आहे. आता शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. पूर्वी शिक्षणाच्या संधी उपलब्ध नव्हत्या. आता मुलांना सर्व काही क्षणात उपलब्ध होत आहे. पालकांनी आपल्या मुलांना योग्य मार्गाने नेले पाहिजे, असे यावेळी सचिन परब यांनी सांगितले.

 आताच्या धावत्या जगात गोष्टी कुठेतरी लुप्त होत चालल्या आहेत. आज आजीच्या गोष्टी नातवंडे ऐकायला तयार नाही. अशा काळात एका मुलीचे आज गोष्टींचे पुस्तक प्रकाशित होत आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आताची मुले मोबाईल, टिव्ही याकडे जास्त आकर्षित असतात. त्यामुळे त्यांना गोष्टी ऐकण्यात रस नसतो. समृद्धीने जुन्या गोष्टींना नवीन वळण दिले आहे. तिचे कौतुक करण्यासारखे आहे, असे  कवयित्री लीना पेडणेकर यांनी सांगितले.

 या पुस्तक प्रकाशनाचे खास आकर्षण म्हणजे या कार्यक्रमाचे फलकही झाडांच्या पानांपासून बनविलेले होते. तसेच पुस्तकही रंगीत पताकातून न गुंडाळता ते पानांनी  गुंडाळलेले होते. या ठिकाणी कुठेच प्लास्टिकचा वापर करण्यात अलेला नव्हता. प्रारंभी गावस हिने गणेशस्त्राsताने कार्यक्रमाची सुरुवात केली. शुभदा च्यारी हिने सूत्रसंचालन केले तर पौर्णिमा केरकर यांनी आभार मानले.

 

Related posts: