|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सरकारी योजनांचा शेतकऱयांनी लाभ घ्यावा

सरकारी योजनांचा शेतकऱयांनी लाभ घ्यावा 

कृषिमंत्री विजय सरदेसाई यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ पर्वरी

गोवा सरकार राज्यातील शेतकऱयांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांचा शेतकऱयांनी लाभ घ्यावा. या योजना सर्व शेतकऱयांपर्यंत नेण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री विजय सरदेसाई यांनी केले.  

पर्वरी मतदारसंघातील फार्मर क्लबच्या सभासदांसाठी सुकूर ग्रामपंचायतीतर्फे आयोजित कृषी मेळाव्यात शेतकऱयांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महसूलमंत्री रोहन खंवटे, गृहनिर्माणमंत्री जयेश साळगावकर, जि.पं.सदस्य गुपेश नाईक, वैशाली सातार्डेकर, सरपंच अनिल पेडणेकर , सरपंच संदीप साळगावकर, कृषी संचालक उल्हास पै काकोडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

शेतकरी स्वतः शेतात राबून, घाम गाळून शेती करतात. त्यांना शेतीबाबत समाधान मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2022 सालापर्यंत भारत सुपर पॉवर देश निर्माण करायचा आहे. तोपर्यंत शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या अनेक योजना कार्यान्वीत होणार असे पृषीमंत्र्यांनी पुढे बोलताना सांगितले.

तीन महिन्यात कूळ-मुंडकार प्रकरणे मामलेदारांकडे : महसूलमंत्री

देशात 70 टक्के शेतकरी आहेत. मात्र गोव्यात फक्त 2 टक्के लोक शेती करतात. त्यामुळे सरकारच्या वार्षिक अर्थसंकल्पात कमी प्रमाणात निधीची योजना करण्यात येते. सरकार शेतकऱयांना पाठिंबा देणार असून त्यांनी भावी पिढी शेती व्यवसायात आकर्षित होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही कृषीमंत्री सरदेसाई यांनी यावेळी केले. येत्या तीन महिन्यात कूळ-मुंडकार कायद्यांतर्गत येणारी सर्व प्रकरणे पुर्ववत मामलेदारांकडे वर्ग करून त्यांच्यामार्फत जलदगतीने सोडविण्यासाठी सरकार प्रयत्न करील, असे आश्वासन महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी दिले.

तरूण पिढीला शेतीची आवड निर्माण व्हावी

शेतीबाबत जागरूकता व्हावी म्हणून पर्वरी मतदारसंघात फार्मर क्लबची स्थापना केली. त्याचा योग्य फायदा येथील शेतकऱयांनी घेतला. त्यांच्यासाठी आधुनिक यंत्रणेची सोय करून शेतीला चालना दिली असून या भागात पडीक शेतजमिनी असून त्यांची लागवड ज्येष्ठ शेतकऱयांनी करून तरूण पुढीला शेती व्यवसायाची आवड निर्माण करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

तसेच शेतकऱयांनी जिद्द व आधुनिक तंत्रज्ञान याच्या वापराने फळाची लागवड करणे देखील महत्त्वाचे आहे. आपण महसूलमंत्री या नात्याने लोकांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार योग्य ते बदल करण्यास आपण तयार असून विरोधी पक्षात काम करताना केलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करून त्या सरकारच्या सहाकार्याने मार्गी लावण्यात येतील, असे मंत्री खंवटे शेवटी म्हणाले.

फार्मर क्लबचा शेतकऱयांना फायदा : गृहनिर्माणमंत्री

यावेळी बोलताना मंत्री जयेश साळगावकर म्हणाले की, सुमारे सात वर्षांपूर्वी सुरू केलेल्या फार्मर क्लबचा फायदा सध्या शेतकऱयांना होत होत याबाबत गृहनिर्माणमंत्री जयेश साळगावकर यांनी अभिनंदन केले. शेतकऱयांना आवश्यक मदत आपण करणार, असे आश्वासन त्यांनी दिले.

या मेळाव्यात कृषी संचालक उल्हास पै काकोडे, सरपंच संदीप साळगावकर यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी 2015-2016 सालातील उत्कृष्ट फार्मर क्लब होली क्रॉस शायन फार्मर क्लब आणि रवळनाथ फार्मर क्लब, किटला यांचा गौरव करण्यात आला. तसेच उत्कृष्ट शेतकरी म्हणून प्रकाश मडकईकर व इजाबेल डिसोजा यांनाही यावेळी गौरविण्यात आले.

यावेळी स्वागत अनंत प्रभुदेसाई यांनी केले. तर सूत्रसंचालन गोकुळदास गावडे यांनी केले. या मेळाव्याला शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related posts: