|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मुंबई विद्यापीठाची विद्यावाहिनी कुडाळात

मुंबई विद्यापीठाची विद्यावाहिनी कुडाळात 

प्रतिनिधी/ कुडाळ

‘फिरते ज्ञान’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या विद्यावाहिनीचे आगमन येथील बॅ. नाथ पै कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय आणि बॅ. नाथ पै कला, वाणिज्य व विज्ञान रात्र महाविद्यालय एमआयडीसी कुडाळ येथे झाले आहे. कुडाळ नगर पंचायतीच्या नगरसेविका मेघा सुकी यांच्या हस्ते ही विद्यावाहिनी विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली आहे. 25 एप्रिलपर्यंत ही वाहिनी येथे राहणार आहे.

फिरते ज्ञान या संकल्पनेवर आधारित मुंबई विद्यापीठाची ही विद्यावाहिनी अत्याधुनिक शैक्षणिक साधनांनी युक्त अशी आहे. या वाहिनीमध्ये पाच कॉम्प्युटर, एक एलसीडी प्रोजेक्ट, 160 इंच प्लाझ्मा स्क्रिन मॉनिटर, वायफाय, ई-बूक जर्नल्स्, इलेक्ट्रीक जनरेटर अशा अत्याधुनिक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. इंग्रजी व मराठी भाषेतील हजारो पुस्तके विद्यावाहिनीमध्ये उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे इतिहास, कला, वैज्ञानिक वृद्धी, इंग्लिश स्पिकिंग, व्यक्तिमत्व विकास यावर अनेक पुस्तके आहेत. विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

विद्यावाहिनी येथे दाखल झाल्यानंतर बॅ. नाथ पै विद्यालयात स्वागत करण्यात आले. सौ. सुकी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुंबई महाराष्ट्राला कशी मिळाली, याची माहिती देणारी चित्रफित दाखविण्यात आली. शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजिज पठाण यांच्यासह प्राचार्या सौ. स्वरा गावडे, प्राचार्य समीर तारी, भाग्यश्री वाळके, मनाली प्रभू व महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

मुंबई विद्यापीठाचा हा उपक्रम चांगला असून मुलांसाठी लाभदायक आहे. याचा फायदा घ्यावा, असे आवाहन सौ. सुकी यांनी केले. यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुनील पाटील, संचालक विद्यार्थी कल्याण विभाग मोहन होडावडेकर, प्रा. आशिष नाईक, उपसमन्वयक सांस्कृतिक विभाग सिंधुदुर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.