|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » प्रदुषण मर्यादा ओलांडीत असल्यास कोळसा हाताळणी बंद करा

प्रदुषण मर्यादा ओलांडीत असल्यास कोळसा हाताळणी बंद करा 

प्रतिनिधी/ वास्को

कोळसा प्रदुषण रोखण्याची जबाबदारी गोवा प्रदुषण नियंत्रण मंडळाची आहे. मंडळाने हे प्रदुषण बंद करण्यास कंपन्यांना भाग पाडावे. अन्यथा कोळसा हाताळणीच बंद करावी अशी मागणी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी केली आहे. लाकडी तुकडय़ांच्या हाताळणीला मात्र, त्यांनी ठाम विरोध केलेला आहे. लाकडी तुकडय़ांची हाताळणी त्वरीत बंद करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

आज बुधवारपासून शुक्रवारपर्यंत मुरगाव बंदरातील तीन भावी प्रकल्पासंबंधी वास्कोतील टिळक मैदानावर जनसुनावणी होणार असून कोळसा हाताळणीशी हे प्रकल्प जोडलेले असल्याने या प्रकल्पांना या जनसुनावणीत जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे. या पाश्वभूमीवर काल मंगळवारी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोळसा प्रदुषणाला आपलाही ठाम विरोध व्यक्त केला. कोळसा हाताळणी पूर्णपणे बंद करता येणार नाही. कारण विविध उद्योग व रोजगार या हाताळणीमध्ये गुंतलेला असल्याने प्रदुषणाला नियंत्रणात ठेवूनच हा उद्योग व्हायला हवा. गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने कोळसा हाताळणीवर वचक ठेवायला हवा. जर हे प्रदुषण मर्यादा ओलांडत असल्यास हाताळणीच बंद करायला हवी. मुरगाव बंदरातून होणाऱया कोळसा हाताळणीमुळे प्रदुषण मर्यादा ओलांडीत असल्याचे वारंवार सिध्द झालेले आहे. मात्र, प्रदुषण नियंत्रण मंडळ या प्रदुषणाबाबत गंभीर नाही. ते कडक कारवाई करीत नाही असा आरोप आमदार कार्लुस आल्मेदा यांनी केला. लाकडी तुकडय़ांच्या हाताळणीमुळे प्रदुषण होत असल्याचे मान्य करून हे प्रदुषण फार गंभीर असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे लाकडी तुकडय़ांची हाताळणी पूर्णपणे बंद करायला हवी अशी मागणी त्यांनी केली. मुरगाव बंदरातील प्रदुषणाबाबत राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ गंभीर नसल्याने सरकारने काही मान्यवर तज्ञांची एक समिती नेमावी. ही समिती मुरगाव बंदरातील प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी जागरूकपणे कार्य करू शकेल. ही मागणी आपण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे करणार असल्याचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी सांगितले.

निवडणुकीच्या व्यापामुळे मागचे सहा महिने आपणही या प्रदुषणाच्या समस्येवर फारसे लक्ष केंद्रीत करू शकलो नाही. मात्र, यापूर्वी आपणच मुरगाव पालिकेला पत्र लिहून कोळसा प्रदुषणाविरूध्द कारवाई हाती घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर पालिकेने कोळसा हाताळणीवर निर्बंध आणले होते. 2012 साली सत्तेवर आपल्याच सरकारने मुरगाव बंदरातील धक्का क्रमांक 10 व 11 वरील कोळसा हाताळणी कायमची बंद केली होती. तरीही बंदरातील इतर धक्क्यांवरील हाताळणीमुळे प्रदुषण होत असल्याने आपण विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता असे आमदार आल्मेदा यांनी नमूद केले.

आपण बंदरातील प्रदुषणाविरूध्द असून जोपर्यंत प्रदुषण बंद होत नाही, तोपर्यंत बंदरातील धक्क्यांचा विस्तार करण्याचा विचार एमपीटीने करू नये असे स्पष्ट करून त्यांनी बंदरातील भावी धक्क्यांना व विद्यमान धक्क्यांच्या विस्ताराला विरोध दर्शवला. आहे त्या सुविधाव्दारे करण्यात येणाऱया व्यवसायांवरच नियंत्रण ठेवणे एमपीटीला शक्य होत नाही. त्यामुळे नवीन धक्क्यांवरील व्यवसायांवर नियंत्रण ठेवणे कसे शक्य होईल असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाला जनतेने पुन्हा घरी पाठवले आहे. जनमताचा आदर करून त्यांनी बोलणे बंद करावे अशी टिका जुझे फिलिप डिसोजा यांचे नाव न घेता त्यांनी केली. समुद्रातील गाळ उपसणे सागरी मार्गे होणाऱया व्यवसायाच्या व जहाजांच्या सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. परंतु वैज्ञानिकदृष्टय़ा अभ्यास करून गाळ उपसण्याचे काय दुष्परीणाम होऊ शकतात याचीही चाचपणी करायला हवी असे मत त्यांनी गाळ उपसासंबंधी मांडले. एमपीटीच्या खासगीकरणाला तसेच गोवा शिपयार्डमधील कंत्राटी कामगार पध्दतीला आमदार कार्लुस आल्मेदा यांनी विरोध केला.

 

Related posts: