|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रस्त्याच्या खडीसाठी धरणाशेजारीच ‘ब्लास्टिंग’

रस्त्याच्या खडीसाठी धरणाशेजारीच ‘ब्लास्टिंग’ 

प्रतिनिधी /खेड :

तालुक्यातील पिंपळवाडी धरणापासून काही मीटर अंतरावर सुरूंग लावून ब्लास्टिंग केले जात असल्याने धरणाला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याला लागणाऱया खडीसाठी संबंधित ठेकेदाराकडून धरणाच्या शेजारीच ब्लास्टिंग केले जात असून ब्लास्टिंगसाठी लागणाऱया कोणत्याही प्रशासकीय परवानग्या घेण्यात आल्या नसल्याची बाबही पुढे आली आहे.

शिरगांव येथील डुबी नदीवर पिंपळवाडी धरण बांधण्यात आले आहे. पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणापासून काही अंतरावरच ड्रेसरसाठी रस्त्याचा ठेकेदार ब्लास्टिंग करत असून या रस्त्यासाठी लागणारी खडी जवळच उपलब्ध व्हावी, यासाठी संबंधित ठेकेदाराने धरणाशेजारीच ब्लास्टिंगचे काम सुरू केले आहे. ब्लास्टिंगच्या हादऱयाने धरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून शिरगांव येथील अशोक किंजळकर, सचिन भोसले, सुधीर भोसले यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी जावून ब्लास्टिंगचे काम बंद पाडले.

या ब्लास्टिंगबाबत येथील तहसीलदारांना खबर दिल्यानंतर नायब तहसीलदारांनी घटनास्थळी जावून संबंधित कामाची पाहणी केली असता या ठिकाणी 1 जेसीबी, 1 डम्पर व काही कामगारही होते. या ठिकाणी सुरू असलेले ब्लास्टिंग अनधिकृत असूनही संबंधित ठेकेदारावर कारवाईसह मशीनरी जप्त होणे गरजेचे होते. मात्र, संबंधित ठेकेदारावर 20 हजार 800 रूपये इतकीच दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. मात्र संबंधित ठेकेदाराकडून होत असलेल्या ब्लास्टिंगमुळे धरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता असतानाही संबंधित ठेकेदाराला अभय कशासाठी? असा प्रश्नही ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.

 

Related posts: