|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शाळांमधून बेकायदेशीर शैक्षणिक साहित्य विक्री थांबवा!

शाळांमधून बेकायदेशीर शैक्षणिक साहित्य विक्री थांबवा! 

प्रतिनिधी /सिंधुदुर्गनगरी :

सिंधुदुर्ग जिल्हय़ातील काही नामांकित शाळांमधून बेकायदेशीररित्या वह्या-पुस्तकांची विक्री केली जात आहे. त्यामुळे शालेय साहित्य विक्री करणाऱया व्यावसायिकांचा धंदा पूर्ण बुडाला असून उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सर्व शाळांमधून बेकायदेशीर वह्या, पुस्तक-विक्री बंद करण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शालेय साहित्य विक्री व्यावसायिक संघटनेने जि. प. अध्यक्षा रेश्मा सावंत, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांची भेट घेऊन केली आणि आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

शालेय साहित्य विक्री व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष सचिन कुरतडकर, सचिव चंद्रशेखर पेडणेकर, खजिनदार साईशकुमार केसरकर, यशवंत खोत, हनुमंत पाटकर, प्रकाश पावसकर, सच्चिदानंद धारगळकर, प्रशांत राणे, अजय मयेकर यांच्यासह जिल्हय़ातील शालेय साहित्य विक्री व्यावसायिक बहुसंख्येने उपस्थित राहत निवेदन सादर केले आहे.

जिल्हय़ातील काही शाळा व शैक्षणिक संस्था शाळेमध्ये राजरोसपणे बेकायदेशीरपणे शैक्षणिक साहित्याची विक्री करतात. वास्तविक बेकायदेशीरपणे शैक्षणिक साहित्य शाळेमध्ये विकणे किंवा ठराविक दुकानातून खरेदी करण्याची सक्ती करण्यात येऊ नये, असा शासन निर्णय आहे. परंतु या शासन निर्णयाची पायमल्ली करून शैक्षणिक साहित्य विक्री शाळांमधून केली जात आहे. बेकायदेशीररित्या लाखो रुपयांची उलाढाल करून व्हॅटही भरला जात नाही. त्यामुळे शासनाचा महसूलही बुडवला जात आहे. तर प्रामाणिकपणे शालेय साहित्य विक्री करणाऱया व्यावसायिकांचा मात्र उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शाळांमधील बेकायदेशीर विक्री बंद करण्याची कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

 

Related posts: