|Monday, September 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खोर्जुवे किल्ल्यावर 14 रोजी ‘हॅरिटेज जत्रा’

खोर्जुवे किल्ल्यावर 14 रोजी ‘हॅरिटेज जत्रा’ 

प्रतिनिधी/ पणजी

ऐतिहासिक वारसा स्थळाबाबत जनजागृती व्हावी आणि त्यांचे संवर्धन करावे या हेतूने विविध युवा संस्था-गटातर्फे ‘हेरीटेज जत्रा 2017’ हा उपक्रम खोर्जुवे किल्ल्यावर रविवार दि. 14 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे.

या उपक्रमाचे प्रमुख कपिल कोरगांवकर आणि इतरांनी पत्रकार परिषेदत याची माहिती देऊन सांगितले की सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 6 पर्यंत संपूर्ण दिवसभराच हा उपक्रम असून त्यात स्पर्धा, चर्चा, फोटोग्राफी अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. या निमित्ताने तेथे साफसफाई-स्वच्छता करण्यात येणार असून किल्ल्याची माहिती देणारे प्रदर्शनही लावण्याचा विचार आहे.

गोव्यात अनेक ऐतिहासिक वारसा स्थळे असून ती टिकवून ठेवणे काळाची आणि संस्कृतीची गरज आहे. त्याकडे जनतेचे-सरकारचे आणि प्रामुख्याने युवा पिढीचे लक्ष वेधणे-जागृती करणे हा हेतू ठेवण्यात आला आहे. गोव्यात 42 किल्ले आहेत. परंतु त्यांची फारशी माहिती जनतेला नाही. केवळ 7 किल्लेच दिसतात आणि त्यांचा उल्लेख होतो किंवा ते हॉटेल प्रकल्पांमुळे कसे तरी शाबूत आहेत परंतु त्यांची शैली मात्र बदलली आहे. तेथील गावातील लोकांनी या हेरिटेज जत्रेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेला विविध संस्थाचे प्रतिनिधी हजर होते त्यात प्रजल साखरदांडे, रमेश मठकर, तेजस पंडीत, मलिक डालमिया, प्रशांत सावंत, निखिल मडगांवकर, साईश राठवड, सुप्रणित रायकर यांचा समावेश होता. त्या सर्वांनी हेरिटेज जत्रेविषयी आपापले विचार मांडले आणि जत्रा यशस्वी करण्याचे आवाहन केले.