|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मद्यपी चालकांची होणार अचानक तपासणी

मद्यपी चालकांची होणार अचानक तपासणी 

मालवण सायंकाळनंतर शहरी आणि ग्रामीण भागात भरघाव वेगाने दुचाकी आणि कार चालविण्याचे प्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सायंकाळनंतरही पोलिसांकडून शहर व ग्रामीण भागात मद्यप्रशान करून वाहने चालविणाऱया चालकांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे वाढत चाललेल्या अपघांना आळा बसविण्याची शक्यता आहे.

मद्यप्राशन करून वाहन चालविल्याने होणाऱया अपघातांना आळा बसावा, यासाठी मोठय़ा वाहनचालकांबरोबर आता दुचाकीस्वारांचीही पोलिसांकडून तपासणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हय़ातील प्रत्येक पोलीस ठाण्यास मद्यप्राशन चाचणी करणारे तपासणी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी कर्मचाऱयांना तपासणीचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. सायंकाळनंतरही मद्यपींवर करडी नजर पोलीस यंत्रणेची आता असणार आहे. यासाठी खास पथकेही नियुक्त करण्यात आल्याचे समजते.

शहरी भागातही होणार अचानक तपासणी

महामार्गावर होणाऱया अपघातांची वस्तुस्थिती पाहता अनेक अपघात हे मद्यपी वाहनचालकांमुळेच झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महामार्गावर पोलिसांकडून मद्यप्रशान करून वाहन चालविणाऱयांची यंत्राद्वारे तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुख्य रस्यांवर प्रत्येक वाहनचालकांची तपासणी पोलिसांमार्फत करण्यात येत होती. सुरूवातीस याची अंमलबजावणी केवळ महामार्गावरच प्रभावीपणे करण्यात येत होती. मात्र, मोठय़ा वाहनचालकांबरोबरच दुचाकींच्या अपघातातही मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱयांची संख्या जास्त असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने मोठय़ा वाहनचालकांबरोबरच आता दुचाकीस्वारांचीही तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरी भागात सायंकाळंनतर सर्रासपणे मद्यपी दुचाकीस्वार दिसून येत असतात.

पोलीस कर्मचाऱयांना प्रशिक्षण

या पार्श्वभूमीवर जिल्ह्य़ातील सर्व पोलिस ठाण्यांना मद्यप्राशन चाचणी करणारे अत्याधुनिक यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. या यंत्राची हाताळणी करण्यासाठी पोलीस कर्मचाऱयांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या यंत्रात मद्यपी दुचाकीस्वाराचे छायाचित्र घेण्याबरोबरच त्याने मद्य प्राशन केले आहे की नाही याची चाचणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दुचाकीस्वाराची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास संबंधित दुचाकीस्वारास कारवाईसाठी थेट न्यायालयात हजर केले जाणार आहे. मद्यपी दुचाकीस्वारांवर कारवाईसाठी पोलीस प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे अपघातांना रोखण्यास मदत मिळणार आहे. तालुक्यात मोठय़ा वाहनांबरोबरच दुचाकीस्वारांच्या तपासणीस पोलिसांनी रविवारपासून सुरुवात केली आहे.