|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मुख्याधिकारी-कर्मचाऱयांवरील कामाचा ताण वाढताच

मुख्याधिकारी-कर्मचाऱयांवरील कामाचा ताण वाढताच 

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीची निर्मिती होऊन वर्ष उलटले व लोकप्रतिनिधी नियुक्त होऊन 12 मे रोजी वर्ष होत आले, तरी राज्य शासन नियुक्त महत्वाचे नऊ अधिकारी-कर्मचारी नेमणूक करायचे आहेत. ते न केल्याने मुख्याधिकारी व प्रशासकीय कर्मचाऱयांवर कामाचा ताण वाढत आहे.

 कुडाळ न. पं.चा आकृतीबंध हा 20 न. पं. प्रशासन नियुक्त (पूर्वीच्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱयांमधील पात्र कर्मचाऱयांमधील) व नऊ राज्य शासनाकडून नियुक्त असा 29 कर्मचाऱयांचा आकृतीबंध मंजूर आहे.

                    महत्वाची पदेच रिक्त

 शहरातील विकास प्रक्रिया, समस्यांचे निराकरण, स्वच्छता, करवसुली यासारख्या महत्वाच्या कामांचे नियोजन करून त्या पूर्ण करण्यासाठी असणारे अधिकारी व कर्मचारीच अद्याप नियुक्त केलेले नाहीत. कुडाळ शहर जिल्हय़ाचे मध्यवर्ती ठिकाण असून अधिकारी, कर्मचारी मोठय़ा संख्येने या शहरात राहतात. चाकरमान्यांचे आवडीचे ठिकाण म्हणून कुडाळकडे पाहिले जाते. सत्तर टक्केहून अधिक फ्लॅटमध्ये चाकरमानीच राहतात. अशा या शहराला अनेक सुविधांची वानवा आहे. शहरातील विकास-बांधकामे, रस्ते, इमारत बांधकामांवर नियंत्रण ठेवून ती कामे मार्गी लावणारा कायमस्वरुपी अभियंता अद्याप कुडाळ न. पं.ला मिळालेला नाही. मालवण येथील अभियंत्यावरच कुडाळला अवलंबून राहवे लागते. तात्पुरत्या स्वरुपात केलेल्या नेमणुकीमुळे थोडीफार कामे मार्गी लागत आहेत. शहरात मोठय़ा प्रमाणावर बांधकामे होताना शहराला कायमस्वरुपी अभियंता तात्काळ मिळणे गरजेचे आहे.

                      स्वच्छता निरीक्षक पदे रिक्त

 कुडाळ शहरात कचऱयाचे ढिग मोठय़ा प्रमाणात दिसत होते. मात्र, न. पं. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी कचरा व्यवस्थापन चांगल्याप्रकारे हाताळत बऱयाच अंशी कचऱयाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकांमध्ये अजूनही जागृती करणे, गटार, सांडपाणी व्यवस्था व अन्य प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक असणारी स्वच्छता निरीक्षकांची दोन पदेही रिक्त आहेत. ही पदे भरली गेली असती, तर मुख्याधिकारी व अन्य कर्मचाऱयांवरील कामाचा ताण कमी होऊन शहरात चांगल्याप्रकारे स्वच्छता मोहीम राबविणे शक्य झाले असते. कचरा निरीक्षकांची दोन पदे तसेच अकौंटंट एका पदासह आणखी दोन पदे मिळून राज्य शासनाकडून नियुक्त होणे आवश्यक असणारी नऊ पदे रिक्तच आहेत. ही पदे तात्काळ भरल्यास शहराच्या विकास प्रक्रियेला गती मिळेल.

                 चालक पद आकृतीबंधात नाही

 कचरा गोळा करण्यासाठी न. पं.ची दोन वाहने असून चार चालक आहेत, तर भाडेतत्वावरही वाहने घ्यावी लागतात. मात्र, न.पं. आकृतीबंधात चालक पदच नसल्याने जे ग्रा.पं.पासून दोन चालक आहेत. त्यांना न.पं.च्या सेवेत सामावून घेणे अशक्य बनले आहे.

              सफाई कर्मचारी पदेही मंजूर नाहीत

 कुडाळ शहराची वस्ती 25 हजारांच्या आसपास आहे. शहरात संकुले व अन्य वस्तीही आहे. सफाई कर्मचाऱयांची या शहराला मोठी गरज आहे. एक हजार लोकवस्तीला एक सफाई कर्मचारी या निकषानुसार अठरा हजार लोकवस्ती धरून 28 पदे होतात. मात्र, या सफाई कामगार पदांना मंजुरीच दिली नाही. मात्र, नऊ पदांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. मात्र, पदेच मंजूर नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱयांना न.पं.च्या सेवेत कायम होण्याची संधी धूसरच बनली आहे. एकंदरच कुडाळ न.पं.चा शासनाचा आकृतीबंध कर्मचाऱयांवर अन्याय करणारा आहे.

           अन्य न. पं.मध्ये घेतले सर्वांना सामावून

 देवरुख, गुहागर, दापोली, जत या नगरपालिकांमध्ये पूर्वी ग्रा.पं.चे जे कर्मचारी होते. त्यांना त्या-त्या पदावर सामावून घेण्यात आले आहे व त्याबाबतचे जीआर प्राप्त आहेत. मात्र, कुडाळसह अन्य काही नगरपालिकांच्या कर्मचाऱयांना शासनाने नवीन नियम लावून त्यांना कायम सेवेपासून दूर ठेवले आहे. सद्यस्थितीत कुडाळ न. पं.मध्ये 56 कर्मचारी कार्यरत आहेत. आकृतीबंध व शैक्षणिक पात्रता अटी-शर्तीनुसार साधारण नऊ-दहाच कर्मचारी कायम सेवेत सामावून घेतले जाणार आहेत. उर्वरित कर्मचाऱयांना तात्पुरत्या स्वरुपातच काम करावे लागणार आहे. कर्मचाऱयांवरील या अन्यायाला वाचा फोडण्याची गरज आहे.