|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कचरा शुल्क फेडण्यासाठी आधी घरे, आस्थापनांची यादी तयार करा

कचरा शुल्क फेडण्यासाठी आधी घरे, आस्थापनांची यादी तयार करा 

प्रतिनिधी/ मडगाव

कचरा शुल्काच्या प्रश्नावर हैराण झालेले लोक जोवर कचरा निर्माण करणाऱया सर्व घरांची आणि आस्थापनांची यादी तयार होत नाही तोवर सदर शुल्क मानून घेणार नाहीत. त्यानंतर उत्पन्नाच्या आधारे दरांच्या बाबतीत वर्गवारी करावी लागेल. मडगाव पालिकेने कचरा शुल्कातून फायदा कमाविण्याचे स्वप्न पाहू नये. आधीच पालिकेची घरपट्टी व परवाना शुल्क आणि त्यांच्याकडून देण्यात येणारी सेवा यात ताळमेळ बसत नाही, अशी टीका सोमवारी मडगावात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ‘शॅडो कौन्सिल फॉर मडगाव’चे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी केली.

नवीन कचरा शुल्क भरमसाट असून ते मागे घ्यावे अशी मडगाव पालिका क्षेत्रातील प्रामाणिक करदात्यांची मागणी आहे. यासंदर्भात मडगाव पालिकेच्या नगराध्यक्षा बबिता आंगले प्रभुदेसाई व मुख्याधिकारी यशवंत तावडे यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे हा विषय मांडण्यात आला होता. दोघांनीही सुधारित दर लागू केल्याशिवाय शुल्काची आकारणी केली जाणार नाही असे आश्वासन दिले होते. मात्र संबंधित कर्मचाऱयांनी लेखी निर्देश मिळाल्याशिवाय पालन करण्यास नकार दिला, याकडे कुतिन्हो यांनी लक्ष वेधले. मंडळाला जवळचे असलेल्या काहींना पद्धतशीर दिलासा देण्यात आला असल्याचा दावाही त्यांनी केला.

नवीन दराने कचरा शुल्क गोळा केले जात नाही असे पालिकेकडून सांगण्यात येत आहे, पण माहिती हक्क कायद्याखाली घेतलेली माहिती वेगळीच कहाणी सांगत आहे, असे दक्षिण गोवा हॉटेलमालक संघटनेचे अध्यक्ष सी. पी. जग्गी यांनी सांगितले. पंधरा ते वीस दिवसांत हा प्रश्न सोडविला जाईल आणि मंडळाची तसेच संबंधित सर्व घटकांची बैठक घेतली जाईल, असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले होते. पण ते अजून साकार झालेले नाही, याकडे लॉरेल आब्रांचिस यांनी लक्ष वेधले. थकबाकीदाराच्या मुद्यावर नगराध्यक्षांनी खोटारडेपणा केला असल्याचा दावा करून त्यांनी पालिका कर चुकता केला असल्याच्या पावत्या सादर करून दाखवाव्यात, असे आव्हान केदार कापडी यांनी दिले. याप्रसंगी झेवियर फर्नांडिस हेही हजर होते.

Related posts: