|Monday, August 19, 2019
You are here: Home » उद्योग » थकबाकीदारांवर लवकरच आरबीआयकडून कारवाई

थकबाकीदारांवर लवकरच आरबीआयकडून कारवाई 

वृत्तसंस्था/ मुंबई

थकबाकीदारांवर कारवाई करण्याची परवानगी आरबीआयला आता कायद्याने मिळाल्याने बँकांची थकबाकी असणाऱया लोकांची ओळख पटविण्यास प्रारंभ करण्यात येईल. या प्रकरणी सरकार कोणताही हस्तक्षेप करणार नाही. थकबाकीदारांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार आरबीआयला असणर आहेत. गेल्या आठवडय़ात थकित कर्जांची समस्या सोडविण्याचे कायदेशीर अधिकार आरबीआयला देण्यात आले.

जॉईन्ट लेन्डर्स फोरमच्या वतीने अनेक प्रकरणे सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे या सर्व केसेस आता आरबीआयकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. आता आरबीआय प्रत्यक्षपणे बँकांशी संपर्क साधत थकित कर्जाची समस्या सोडविणार असल्याचे अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱयाने म्हटले. द इंडियन बँक असोसिएशन आणि उद्योगांच्या कर्ज पुनर्रचना विभागाने थकित कर्जाबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला अपयश आले होते. या कर्जांच्या प्रकरणात आरबीआय प्रत्यक्ष बँकांना आदेश देईल असा अंदाज आहे. गेल्या आठवडय़ात अध्यादेश जारी करण्यात आल्यानंतर आरबीआयने थकित कर्जाबाबत कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. यानुसार नियमावलीत काही बदल केले आहेत. थकित कर्जाची समस्या सोडविण्यास बँकांना अपयश आल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे संकेत आरबीआयने दिले आहेत.

थकित कर्ज वसुलीसाठी मध्यवर्ती बँक लवकरच अजून नियम जारी करेल असा अंदाज आहे. याचप्रमाणे अजून एका समितीची स्थापना करण्यात येईल असा अंदाज आहे. एनपीएने 8 लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे.