|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » चक्रीवादळातील नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेज द्या!

चक्रीवादळातील नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेज द्या! 

सावंतवाडी : बांदा दशक्रोशीत चक्रीवादळाने हाहाकार उडविला. लोकांच्या बागायती, घरे, गोठय़ांचे नुकसान झाले. त्यामुळे या भागात झालेल्या नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेज द्यावे, असा एकमुखी ठराव पंचायत समिती बैठकीत मांडण्यात आला.

सभापती रवींद्र मडगावकर यांनी या भागातील नुकसानग्रस्तांचे पंचनामे करा. यासंदर्भात आठ दिवसात आढावा बैठक घेण्याच्या सूचना अधिकाऱयांना त्यांनी दिल्या. विरोधी पक्ष गटनेते रुपेश राऊळ यांनी काही गावात अद्याप पंचनामेच झालेले नाहीत. पं. स. सदस्य श्रीकृष्ण सावंत व रुपेश राऊळ यांनी शेतकऱयांच्या मुद्यावर अधिकाऱयांना चांगलेच खडे बोल सुनावले. पावसाळय़ापूर्वी वीज, टेलिफोन यंत्रणा गावात सतर्क ठेवा, अशी मागणी करण्यात आली.

सावंतवाडी पंचायत समितीची मासिक बैठक मंगळवारी मडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आजच्या बैठकीत दोन दिवसांपूर्वी बांदा परिसरात झालेल्या चक्रीवादळाचा मुद्दा चर्चेला आला. बांदा दशक्रोशीत वीजपुरवठा खंडित आहे. मात्र, वीज वितरणचे अधिकारी व कर्मचारी सुशेगाद असल्याचा आरोप  संदीप गावडे, रुपेश राऊळ, शीतल राऊळ यांनी केला. केवळ काही बडय़ा शेतकऱयांच्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. छोटय़ा शेतकऱयांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास कृषी विभाग टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे करावे, असे  राऊळ यांनी सूचित केले. मडगावकर यांनी महसूल व कृषी विभागाने त्वरित पंचनामे करून आठ दिवसात अहवाल सादर करावा, असे आदेश दिले.

डिजिटलचे फॅड हवे कशाला?

मराठी माध्यमाच्या शाळांकडे विद्यार्थी येण्यास तयार नसतात.  ‘डिजिटल इंडिया’च्या माध्यमातून प्राथमिक शाळा डिजिटल केल्या जात आहेत. डिजिटल शाळा करण्यासाठी शिक्षक, लोकप्रतिनिधींना गळ घातली जाते. आम्ही पैसे आणायचे कोठून? असा सवाल सदस्य श्रीकृष्ण सावंत यांनी करीत शेतकऱयांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला, उपायांसाठी पैसा नसताना डिजिटलचे फॅड हवे कशाला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

शेती ओस पडणार!

गावागावात शेती, बागायती करणे कठीण झाले आहे. गवारेडे, माकड यांच्या दहशतीमुळे यंदा शेतकऱयांनी शेतीच नको, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे शेती ओस पडणार आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसात गावारेडे, माकडांचा बंदोबस्त करा अन्यथा व्यापक आंदोलन उभारू, असा इशारा श्रीकृष्ण सावंत, रुपेश राऊळ, संदीप नेमळेकर, शीतल राऊळ यांनी दिला. .

वीज विभागाचे अधिकारी ‘राजे’

तालुक्यातील ग्रामीण भागात दोन-दोन दिवस वीज खंडित असते. काही गावात मंद लाईट आहे. चक्रीवादळामुळे बांदा, ओटवणे, वाफोली पंचक्रोशी अंधारात आहे. वीज विभागाचे अधिकारी ‘राजे’ बनले आहेत, अशी टीका श्रीकृष्ण सावंत, पंकज पेडणेकर, संदीप नेमळेकर, शीतल राऊळ यांनी टीका केली. पावसाळय़ापूर्वी तालुक्यातील सर्व गावांमधील झाडेझुडपे साफ करा, वायरमन अलर्ट ठेवा, अशी रुपेश राऊळ, मोहन चव्हाण यांनी स्पष्ट केले.

दूरसंचार अधिकारी धारेवर

अनेक गावातील रस्ते टेलिफोनची केबल लाईनसाठी खोदण्यात आले आहेत. या चरांमुळे विलवडे येथे अपघात झाले आहेत. माजगाव, मळगाव, तळवडे, कलंबिस्त गावातील चरांमुळे शेतकऱयांचे नुकसान झाले आहे. पावसाळा जवळ आला असून हे चर बुजवावेत, अशी मागणी राऊळ, सावंत, पेडणेकर यांनी केली. याप्रश्नावर दूरध्वनी अधिकाऱयांना धारेवर धरण्यात आले. सभापती मडगावकर यांनी 20 मे पर्यंत सर्व केबललाईन पूर्ण करून चर बुजवा, असे आदेश दूरसंचार अधिकाऱयांना दिले.

शिक्षण विभागाच्या कारभारावर नाराजी

कारिवडे प्राथमिक शाळेतील वादाच्या मुद्यावर राऊळ यांनी शिक्षण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. धाकोरे शाळेचे छप्पर कोसळले आहे. त्यामुळे पर्यायी जागा पहा, असे मनीषा गोवेकर यांनी सांगितले. पाडलोस गावातील नळ कनेक्शन तोडण्यात आली आहेत. वायरमन, तलाठी, ग्रामसेवक, दूरसंचार कर्मचारी हे गावात वेळेत नसतात. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात हजेरी मशिन ठेवावी, अशी मागणी राऊळ यांनी केली. कोलगाव मारुती मंदिर परिसरातील वीजकाम पूर्ण केलेले नाही, असे मेघश्याम काजरेकर यांनी सांगितले. विविध मुद्यांवर आजच्या सभेत सदस्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. मनीषा धुरी, गौरी पावसकर, उपसभापती निकिता सावंत, अक्षया खडपे, मेघश्याम काजरेकर, संदीप गावडे, रुपेश गाऊळ, पंकज नेमळेकर, श्रीकृष्ण सावंत, शीतल राऊळ, गटविकास अधिकारी मोहन भोई उपस्थित होते.

मला कंडक्टर ठेवा!

गावागात एस. टी. बसेस वेळेवर जात नाहीत. वेत्ये, सोनुर्ली गावात बस न गेल्याने प्रवासाची सोय आम्ही केली. एस. टी. विभागात याबाबत बस का सुटली नाही म्हणून विचारणा केली असता कंडक्टर नाही, असे उत्तर दिले. त्यावर मलाच कंडक्टरची नोकरी द्या, अशी मागणी आपण केल्याची माहिती श्रीकृष्ण सावंत यांनी सभागृहात दिले.

Related posts: