|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » त्रिशंकू भागाच्या विकासासाठी 34 लाख रुपये मंजूर

त्रिशंकू भागाच्या विकासासाठी 34 लाख रुपये मंजूर 

            प्रतिनिधी / सातारा

सातारा शहरालगत असलेल्या शाहुनगर, विसावा नाका, गोडोली या त्रिशंकु भागाच्या विकासासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून आठ विकासकामांना 34 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आठही कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून शाहूनगर व विसावा नाका, गोडोली परिसरातील रस्त्यांची कामे यामुळे लवकरच मार्गी लागणार आहेत. 

ग्रामपंचायत अथवा नगरपालिका हद्दित समावेश नसल्याने त्रिशंकू भाग नेहमीच विकासापासून वंचित राहतो. मात्र आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सातत्याने शाहूनगर, विसावा नाका, गोडोली आदी परिसर विकासाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी आमदार फंड, जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद निधीच्या माध्यमातून विविध विकासकामे वेळोवेळी मार्गी लावून तेथील नागरिकांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

जिल्हा परिषद सदस्य सौ. मधु कांबळे आणि पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण यांच्या मागणीनुसार शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून सातारा जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील शाहूनगर, विसावा नाका, गोडोली येथील त्रिशंकू भागातील विकास कामांसाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधी अंदाजपत्रकामध्ये 34 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

विसावा पार्क येथील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण आणि खडीकरणासाठी 10 लाख रुपये, चार भिंतीपासून ते अजिंक्यतारा रोड चौकापर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणासाठी 3 लाख, अजिंक्य चौक ते चार भिंतीकडे जाणाऱया रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरणासाठी 3 लाख, शाहुनगर गोडोली येथील राजमाता सुमित्राराजे हौसिंग सोसायटीतील अंतर्गत रस्ता आणि गटरचे काम करण्यासाठी 6 लाख, अजिंक्य चौक ते घोलप बंगला रस्ता खडीकरण, डांबरीकरण करण्यासाठी 3 लाख, विद्यानगर रयत शिक्षक कॉलनीतील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण करण्यासाठी 3 लाख, पालवी चौक ते महादेव मंदीर या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 3 लाख तर, शिवनेरी कॉलनी येथील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 3 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. 

तातडीने प्रशासकीय सोपस्कार पुर्ण करुन कामे दर्जेदार करण्याच्या सूचना शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱयांना केल्या आहेत. दरम्यान, त्रिशंकू भागातील प्रलंबित रस्त्यांची कामे मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Related posts: