|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » खासगी सावकारांना मोक्का लावा

खासगी सावकारांना मोक्का लावा 

प्रतिनिधी/ कराड

खासगी सावकारांनी कराडसह ओगलेवाडी, बनवडी, मलकापूर परिसरात उच्छाद मांडला असून त्यांच्या दहशतीमुळे अनेक लोक नैराश्यात आहेत. खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून एका शेतकऱयाने आत्महत्या केल्याने शेतकरी संघटनेसह विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. खासगी सावकारांना मोक्का लावावा, अशी मागणी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे मोर्चाद्वारे करण्यात येणार असून लवकरच सर्वपक्षीय मोर्चा निघण्याची शक्यता आहे.

खासगी सावकारांनी बेसुमार व्याजदराने लोकांना पैसे देत त्यांच्याकडून वाटेल तेवढी वसुली करण्यासाठी तगादा लावला आहे. यातूनच जीवन संपवण्याचे प्रकार आता सधन समजल्या जाणाऱया कराड तालुक्यात घडत आहेत. पार्ले येथील शेतकऱयाने खासगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केली तर सुपने येथील एकजण खासगी सावकारांच्या भीतीने सात महिन्यापासून बेपत्ता आहे. वडगाव हवेली येथील चव्हाण बंधूंनी एकाच दिवशी आत्महत्या करत जीवन संपवले होते. पार्ले येथील शेतकऱयाच्या आत्महत्येप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. चारही खासगी सावकारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे. त्याशिवाय अजूनही काही खासगी सावकार अचानक एखाद्याच्या घरी टोळक्याने जाऊन पैशासाठी दहशत माजवत आहेत. खासगी सावकारांची दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी तक्रार देण्याचे आवाहन केले आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवत या प्रकरणाचा अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना पाठवण्याची गरज आहे. मात्र स्थानिक पोलिसांकडून कार्यवाही होत नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. खासगी सावकारांचे अनेक ठिकाणी मोठे लागेबांधे असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. यातूनच अनेक संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. काही संघटनांची नुकतीच कराडात एक बैठक पार पडल्याचे समजते. या संघटनांनी एकत्र येत खासगी सावकारांविरोधात आंदोलन छेडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांना भेटून खासगी सावकारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

कराड परिसरात खासगी सावकारांची दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांत तक्रार द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांकडे केलेल्या तक्रारीची प्रत विश्वास नांगरे पाटील व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनाही पाठवावी, असे आवाहन या संघटनांनी केल्याचे समजते. त्यामुळे येत्या काही दिवसात खासगी सावकारांविरोधातील हा लढा तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related posts: