|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पर्रीकरांसाठी पणजी मतदारसंघ खुला

पर्रीकरांसाठी पणजी मतदारसंघ खुला 

प्रतिनिधी/ पणजी

पणजी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांनी काल बुधवारी 10 रोजी आमदारकीचा राजीनामा दिला. कुंकळकर यांच्या राजीनाम्यामुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कुंकळकर यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभेचे संख्याबळ 38 पर्यंत आले आहे.

गेले अनेक दिवस आमदार सिद्धार्थ कुंकळकर हे राजीनामा देऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासाठी पणजी मतदारसंघ खुला करतील, अशी चर्चा होती. अखेर कुंकळकर यांनी आमदारकीचा राजीनामा सभापती प्रमोद सावंत यांना सादर केला. निवडून आल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत कुंकळकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. याअगोदर काँग्रेसचे आमदार विश्वजित राणे यांनी निवडून आल्यानंतर अवघ्या सहा दिवसात आमदारकीचा राजीनामा दिला होता. नंतर भाजपमध्ये प्रवेश केला आणि पर्रीकर मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री झाले.

गोव्यासाठी पर्रीकरांचा मोठा त्याग : कुंकळकर

राजीनामा सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कुंकळकर म्हणाले की आपण पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. पक्ष जे काम सांगेल ते काम करणार आहे. पक्षाने सांगितल्यानुसार आपण राजीनामा दिलेला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्यासाठी फार मोठा त्याग केलेला आहे. देशाचे संरक्षणमंत्रिपद सोडून ते गोव्यासाठी पुन्हा राज्यात आलेले आहेत. त्यांनी पक्षासाठी तसेच गोव्यासाठी मोठा त्या केला असल्याने त्यांच्यासाठी आपण राजीनामा देणे, ही फार मोठी बाब नाही. पक्षाचा व आपला राजीनामा देण्याचा निर्णय योग्यच आहे असेही ते म्हणाले.

याअगोदर मनोहर पर्रीकर हे पणजी मतदारसंघातून सतत पाचवेळा निवडून आले आहेत. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्रीपद देण्यात आले. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.

पक्षाच्या निर्णयानुसार कुंकळकरांचा राजीनामा

भाजपचे आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांनी पक्षाच्या आदेशावरुन आमदारकीचा राजीनामा दिला आहे. पर्रीकर यांच्यासाठी कुडचडे मतदारसंघ सोडण्याची तयारी तेथील आमदार नीलेश काब्राल यांनीही दर्शवली होती, मात्र पक्षाने निर्णय घेतला की पणजी मतदारसंघ पर्रीकरांसाठी योग्य ठरणार आहे आणि त्यानुसार कुंकळकर यांना राजीनामा देण्यास सांगितले. कुंकळकर यांनीही अगोदरपासूनच पर्रीकरांसाठी मतदारसंघ सोडण्याची तयारी दर्शवली होती.

विधानसभेचे संख्याबळ 38 वर

राज्य विधानसभेतील आमदारांचे संख्याबळ सध्या 38 वर आले आहे. फेब्रुवारी 2017 मध्ये घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर 40 आमदारांची विधानसभा गठीत झाली होती. अवघ्याच दिवसात काँग्रेसचे विश्वजित राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे संख्याबळ 39 वर आले. तर आता सिद्धार्थ कुंकळकर यांनी राजीनामा दिल्याने विधानसभेचे संख्याबळ 38 वर आले आहे.

Related posts: