|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मुळदे शाळेत सभापती पदाचा अवमान!

मुळदे शाळेत सभापती पदाचा अवमान! 

कुडाळ : तालुक्यातील मुळदे प्राथमिक शाळेत डिजिटल वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी सभापतींना सर्वप्रथम बोलण्यास देऊन त्यानंतर इतरांना बोलण्याची संधी देऊन प्रोटोकॉल पाळला नाही. त्यामुळे सभापतीपदाचा अवमान झाल्याचे गुरुवारी कुडाळ पंचायत समितीच्या बैठकीत काँग्रेस सदस्य मिलिंद नाईक यांनी सांगितले. आपणासही केंद्रप्रमुखांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचे ते म्हणाले. यापुढे सभापती-उपसभापती, सदस्यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा देऊन सभागृहात आम्ही सर्व एक आहोत, असे सांगितले.

नाईक यांनी त्या कार्यक्रमात घडलेल्या प्रकाराची माहिती देताना सभापतींच्या भाषणानंतर इतरांची भाषणे झाली. केंद्रप्रमुख मला बाजूला करीत फोटोसाठी पुढे गेले, याचा उल्लेख करून माहिती दिली. प्रोटोकॉल कसा चुकला ते सांगितले. याला दुजोरा देत उपसभापती श्रेया परब यांनी आपल्यालाही काही ठिकाणी याची प्रचिती आल्याचे सांगितले. असे होऊ नये, यासाठी सदस्य, अधिकारी, पेंद्रप्रमुख व कर्मचाऱयांची ओळख परेड आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. यापुढे असे होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे सभापती राजन जाधव यांनी सांगितले.

कुडाळ पं. स.ची बैठक आज पं. स.च्या धर्मवीर संभाजीराजे सभागृहात जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसभापती परब, सभेचे सचिव बाळकृष्ण परब यांच्यासह सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते. प्रारंभी स्मार्ट ग्रामपंचायत हुमरमळा-वालावल व आयएसओप्राप्त वाडोस शाळा यांचे अभिनंदन करण्यात आले.

                    स्वतंत्र यंत्रणा ठेवा

पावसाळा जवळ आला आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसात पुळास येथील निकमवाडीत खंडित झालेला वीजपुरवठा आतापर्यंत सुरळीत नाही, असे श्रेया परब यांनी सांगून पावसात वीज प्रवाह कुठेही खंडित होऊ नये, यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत ठेवा, अशी सूचना चर्चेत करण्यात आली. झाराप-जांभळ थांबा येथे एक वाहिनी बंद आहे. तसेच येथे कनिष्ठ अभियंता नसल्याचे स्वप्ना वारंग यांनी सांगितले. जांभवडे येथे खांब नाही. त्यामुळे होणारी गैरसोय बाळकृष्ण मडव यांनी निदर्शनास आणली. सुप्रिया वालावलकर, गोपाळ हरमलकर, जयभारत पालव, माधवी प्रभू, संपदा पेडणेकर, शरयू घाडी, मथुरा राऊळ, शीतल कल्याणकर आदी सदस्यांनी वीज वितरणच्या समस्या मांडल्या, तर आजच्या बैठकीतील सूचनांबाबत ठोस कार्यवाही अपेक्षित असल्याचे अरविंद परब यांनी सांगितले.

              रुग्णालय समित्या स्थापन करा

जि. प., पं. स.च्या निवडणुका होऊन दोन-अडीच महिने झाले. पं. स.च्या दोन मासिक बैठका झाल्या. परंतु अद्याप आरोग्य समित्या स्थापन झाल्या नाहीत, याकडे सदस्यांनी लक्ष वेधत आरोग्य समित्या स्थापन करण्याची सूचना केली, तर पावसाळी हंगामात आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून काम करावे. तालुक्यात साथरोग येणार नाहीत, यासाठी नियोजन करा, असे आदेश सभापतींनी दिले. डॉ. सुबोध माधव, जयभारत पालव, शीतल कल्याणकर, माधवी प्रभू, अरविंद परब, संदेश नाईक, मिलिंद नाईक, बाळकृष्ण मडव आदींनी आरोग्य विभागाच्या समस्या मांडल्या, तर आरोग्य यंत्रणा सतर्क आहे, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे यांनी सांगून सूचनांचा पाठपुरावा करू, असे स्पष्ट केले.

               पाणीपुरवठा उपकार्यालय कुडाळला आणा

कुडाळ व वेंगुर्ले या दोन तालुक्यांसाठी असलेले पाणीपुरवठा विभागाचे कुडाळ येथे यापूर्वी असलेले उपकार्यालय सध्या ओरोस येथे आहे. ते येथे आणावे, यासाठी सभापतींच्या नेतृत्वाखाली जि. प. अध्यक्षांना सदस्यांनी भेटून प्रयत्न करावा, अशी सूचना मिलिंद नाईक यांनी केली. त्याला सभागृहाने मान्यता दिली.

                       यादी सदोष

सर्वसाधारण व अवघड शाळेचा झालेला सर्व्हे व तयार झालेली यादी ही कोणतेही निकष न बघता केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांनी आपल्या सोयीप्रमाणे केली आहे, असा आरोप मिलिंद नाईक यांनी करून अनेक उदाहरणे देत यादीलाच आक्षेप घेतला, तर पालव यांनी यात पारदर्शकता नसल्याचे सांगितले. सभागृहात सर्वच सदस्यांनी या यादीबाबत चर्चा करताना यादी निकषाप्रमाणे असावी, असे सांगताच गटशिक्षणाधिकारी सूर्यभान गोडे यांनी आता यादी दुरुस्त करून पाठवितो, असे सांगून यादी सदोष असल्याच्या आरोपावर शिक्कामोर्तब केले.