|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » ‘ढोल ताशे’चे निर्माते तापकीर यांची आत्महत्या

‘ढोल ताशे’चे निर्माते तापकीर यांची आत्महत्या 

प्रतिनिधी/ पुणे

‘ढोल ताशे’ या मराठी चित्रपटाचे निर्माते अतुल बाजीराव तापकीर यांनी पुण्यातील हॉटेल प्रेसिंडेटमध्ये विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी तापकीर यांनी फेसबुकवर सुसाईड नोट पोस्ट केली. यामध्ये त्यांनी पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. या दुःखद घटनेमुळे मराठी चित्रपटसृष्टीला हादरा बसला आहे. तापकीर यांच्या मागे वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

तापकीर शनिवारी रात्री हॉटेलमध्ये थांबले होते. सकाळी 11 च्या सुमारास हॉटेलच्या कर्मचाऱयांना रुममध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती तातडीने डेक्कन पोलिसांना देण्यात आली.

तापकीर यांनी 3 जुलै 2015 रोजी ‘ढोल ताशे’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटामुळे त्यांचे नाव झाले. जितेंद्र जोशी, हृषित भट, अभिजीत खांडकेकर अशा नामवंत कलाकारांनी या चित्रपटात भूमिका केली आहे.

मात्र, हा चित्रपट यशस्वी झाला नाही. त्यामुळे तापकीर यांना बराचसा आर्थिक तोटा झाला आणि त्यातून कर्जही झाले होते. त्यानंतर त्यांची पत्नी प्रियंका व अतुल यांच्यात वादाला सुरुवात झाली. प्रियंका यांनी अतुल यांना घराबाहेर काढले. मला माझ्या मुलांपासून दूर केले, त्यांना भावाच्या मदतीने मारहाणही केली. फोनवर शिवीगाळ केली, तसेच माझ्या मुलांचा सांभाळ हा माझ्या वडिलांनी करावा, रोजचा मानसिक छळ मला सहन होत नाही. किती ही माझी आणि माझ्या घरच्यांची इज्जत घालवणार? त्यापेक्षा मेलेले बरे. मी सर्वांची माफी मागतो आहे. मी आईसोबत राहणार असल्याचा आनंद होत आहे, असे फेसबुकवरील सुसाईड नोटमध्ये लिहून तापकीर यांनी आपले जीवन संपवले. या पोस्टने चित्रपटसृष्टीतील कलाकारांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या घटनेने चाहत्यांमधूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.