|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ‘सेव्ह आरे कॉन्झर्व्हेशन’तर्फे रॅली

‘सेव्ह आरे कॉन्झर्व्हेशन’तर्फे रॅली 

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही झाडे न तोडण्याच्या मागणीवर ठाम

प्रतिनिधी/ मुंबई

आरेतील पर्यावरणाचे रक्षण व्हावे म्हणून ‘सेव्ह आरे कॉन्झर्व्हेशन’ ग्रुपच्यावतीने रविवारी सकाळी सिद्धिविनायकाला साकडे घालण्Aयात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरेतील झाडांचे रक्षण करून प्रस्तावित मेट्रो 3 हा प्रकल्प साकारावा, अशी मागणी यावेळी सिद्धिविनायकाच्या चरणी करण्यात आली.

तत्पूर्वी ‘सेव्ह आरे कॉन्झर्व्हेशन’ ग्रुपने रविवारी सकाळी 6.30 वाजता दादरच्या शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ापासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असे फलक हाती घेऊ रॅली काढली. या रॅलीत ग्रुपशी जोडलेले मुंबईतील तरुण-तरुणी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी या अगोदर विविध कार्यक्रमातून दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देणारे फलक यावेळी कार्यकर्त्यांकडून झळकविण्यात आले. त्यानंतर ग्रुपच्या सदस्यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. या दरम्यान  पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी आरेतील झाडे वाचवून मेट्रो 3 प्रकल्प साकारावा, असे मत सदस्यांनी व्यक्त केले. या रॅलीत मुंबई डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकरही सहभागी होते.

मेट्रो 3 या प्रकल्पासाठी आरे ऐवजी कांजूरमार्गच्या जागेचाही पर्याय प्रकल्पाच्या मांडणीत आहे. त्याचा विचार करून सरकारने पर्यायी मार्ग काढावा, अशी आमची अपेक्षा असल्याचे ‘सेव्ह आरे कॉन्झर्व्हेशन’ ग्रुपच्या सदस्या प्रिया मिश्रा यांनी सांगितले. आरे वाचविण्यासाठी आम्ही सर्वच प्रयत्न करत आहोत. सरकारने नवे प्रकल्प आणावेत. पण त्याचवेळी निसर्गाचाही विचार करावा. त्यामुळे नैसर्गिक गोष्टींना धक्का लागणार नाही. अनेकांची श्रद्धा असल्यामुळे आम्ही सिद्धिविनायक, हाजी अली दर्गा अशा मुंबईतील विविध धार्मिकस्थळांना भेट घेऊन दर्शन घेणार आहोत. आम्ही या मोहिमेत यशस्वी होऊ. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते त्याचे पुरावे आमच्याकडे असल्याचे ‘सेव्ह आरे कॉन्झर्व्हेशन’ ग्रुपच्या सदस्य स्टॅलिन दयानंद यांनी सांगितले

Related posts: