|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » राजारामपुरीत भगवे ध्वज काढल्यावरून तणाव

राजारामपुरीत भगवे ध्वज काढल्यावरून तणाव 

 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 पोलीस प्रशासन व महापालिका अतिक्रमण निर्मुलन पथकाकडून सोमवारी (दि. 15) राजारामपुरी परिसरातील भगवे ध्वज हटविण्यात आले. यावर संतप्त सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये जावून कारवाईला विरोध दर्शवला. यामुळे काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.

   राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अरविंद चौधरी यांनी सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाच्या सहाय्याने राजारामपुरी परिसरातील भगवे ध्वज हटविण्याची मोहिम राबवली. यावेळी अतिक्रमण अथवा वाहतुकीस अडथळा ठरत नसलेलीही ध्वज हटविण्यात आल्याने परिसरातील तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, कमलकर जगदाळे यांच्यासह परिसरातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी थेट राजारामपुरी पोलीस ठाणे गाटले.

   शहरामध्ये इतरही ठिकाणी अतिक्रमण झाली असून त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी राजारामपुरीतील अडथळा होत नसलेल्या ध्वजांवरच कारवाई का करण्यात आली असा जाबही विचारण्यात आला. यावेळी पोलीस निरिक्षक चौधरी म्हणाले, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. काहीठिकाणी ध्वजजीर्ण झालेले आहेत. तसेच यापूर्वी लावलेले ध्वज रस्त्यावर पडून धार्मिक तेड निर्माण होवू नये, हा या कारवाई मागील उद्देश आहे. यावर कार्यकर्त्यांनी आम्ही आमच्या परिसरातील कमिटी नेमूण ध्वजाची जबाबदारी घेवू, अशी ग्वाही दिली. यानंतर काढलेले ध्वज परत करण्यात आले.

   आज कमिटीची स्थापना करणार

 या कारवाई नंतर प्रत्येक भागात कमिटीची स्थापना करण्याचा निर्णय झाला आहे. बागल चौक, शाहूपुरी, राजारामपुरी, सायबर चौक, विद्यापीठ चौक, राजेंद्रनगर, प्रतिभानगर या परिसराची कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. आज (दि.16) सायंकाळी 6.30 वाजता राजारामपुरीतील मारुती मंदीर येथे कमिटी स्थापन करण्याची बैठक आयोजित केली आहे. या समितीचा पहिला अजेंडा परिसरातील जीर्ण झालेले ध्वज बदलण्याचा असणार आहे.

      प्रत्येक चौकाचा होणार ठराव

एनसीसी भवन येथील चौकाचे महापालिकेमध्ये ठराव करून ज्या प्रमाणे ध्वजाला मान्यता मिळाली. याच धर्तीवर राजारामपुरीतील विविध चौकांच्या नावे ठराव करण्याचा निर्णय येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. संबंधित भागातील नगरसेवकाची संपर्क साधून हे ठराव केले जाणार आहे.