|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मानकुराद आंब्याचे दर घसरले, ग्राहक सुखावला

मानकुराद आंब्याचे दर घसरले, ग्राहक सुखावला 

 

प्रतिनिधी/ पणजी

मोठय़ा प्रमाणात बाजारात आंबे दाखल होऊ लागल्याने आंब्यांचे दर बरेच उतरले आहेत. मागील आठवडय़ात 400 ते 600 रु. डझन दराने आंबा विकला जात होता. आता तोच आंबा 200 ते 300 रु. दराने विकला जात आहे. त्यामुळे सध्या आंब्यांच्या खरेदीत मोठी वाढ झाली आहे.

सध्या मार्केटमध्ये मानकुराद आंबा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झाला आहे. पणजी मार्केटसह राज्यातील अन्य मार्केटमध्येही आंब्यांची उपलब्धी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये सर्वत्र आंब्यांचा वास सुटला आहे. मानकुराद बरोबरच हापूस आणि मालदेस आंबेही उपलब्ध होऊ लागल्याने आंब्यांचे दर बरेच खाली आले आहेत. मोठा व लहान आकारातील आंबे बाजारात उपलब्ध आहेत. लहान आंबा 150 ते 200 रु. डझन दराने उपलब्ध आहे. तर मोठे आंबे 250 ते 300 रु. दराने उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त झाडावर पिकलेले आंबेही विक्रीसाठी येत आहेत.

पणजी बाजारपेठेच्या मानाने अन्य बाजारपेठांमध्ये आंबे स्वस्त आहेत. फोंडा बाजारपेठत लहान मानकुराद आंबा 100 ते 150 रु. दराने उपलब्ध होत आहे. यंदा मानकुराद आंब्यांचे पीक प्रचंड आल्याने दर घसरला आहे. बार्देश, डिचोली, सत्तरी, तिसवाडी या भागात तर मोठय़ा प्रमाणात पीक आले आहे. यावेळी मानकुराद आंब्यांचे पीक प्रचंड आले आहे. गोव्यात मानकुराद व मालदेश आंब्यांचे प्रमाण जास्त आहे. बाजारात उपलब्ध होणारे हापूस, केसरी व अन्य जातीचे आंबे बाहेरुन येतात.

ग्राहक सुखावला

मानकुराद आंब्याचे दर बरेच खाली आल्याने सध्या ग्राहक बराच सुखावला आहे. मानकुराद आंब्यांना मोठय़ा मागणी असते. कारण गोव्यातील ग्राहक मानकुराद आंब्याला पहिली पसंती देतात. एप्रिल महिन्यात आणि मेच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत दर स्थीर होते मात्र मागील आठवडय़ापासून आंब्यांचे दर बऱयाच प्रमाणात उतरले. मोठय़ा प्रमाणात आंबा बाजारात उपलब्ध झाल्यानेदर अचानकपणे खाली आले. मे महिन्याच्या अखेरपर्यंत यंदा बाजारात मानकुराद आंबा उपलब्ध होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Related posts: