|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » यापुढे गोमेकॉतच सर्व रक्ततपासण्या

यापुढे गोमेकॉतच सर्व रक्ततपासण्या 

प्रतिनिधी/ पणजी

 राज्यातील आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी तसेच गोमेकॉत अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी कंबर कसली आहे. युरोलॉजी, कार्डिओलॉजी, कार्डिओथेरपी, कार्डिया अनेस्थिया, इंडेक्रीनोलोजी अशा विविध खात्यामध्ये सुमारे 21 नविन तज्ञांची भरती केली जाणार आहे. तसेच सुपरस्पेशालिटी साठी नवीन अत्याधुनिक साधन सुविधा वापरल्या जाणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गोमेकॉत आता सुपरस्पेशालिटीद्वारे नविन कोर्सेस सुरु केले जाणार असून  युरोलॉजी, कार्डिओलॉजी, कार्डिओथेरपी, कार्डिया अनेस्थिया, इंडेक्रीनोलोजी, आदी विषयांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना परदेशात जावे लागणार नाही. याविषयी मुख्यमंत्री तसेच डीन यांच्याशी चर्चा झाली आहे. लवकरच नविन 17 डॉक्टरांची येथे नियुक्ती करण्यात येणार आहे, असे राणे यांनी सांगितले.

गोमेकॉत होणार सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या

रक्त तपासणीच्या नावाखाली काही एजंट रुग्णांची लुबाडणूक करतात. ठराविक प्रकारच्या रक्ततपासण्यात बाहेरुन कराव्या लागत असल्याचे सांगून 500 ते 2000 रुपये आकारले जातात. परिणामी रुग्णांना मोठय़ा प्रमाणात पैसे खर्च करावे लागतात. यावर उपाय म्हणून यापुढे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या गोमेकॉतच करण्यात येणार आहेत. त्यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. तसेच  ब्लडबँकेच्या प्रमुखपदी डॉ. मल्ल्या यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असेही राणे यांनी सांगितले.

भ्रष्ट अधिकाऱयांवर होणार कारवाई

आरोग्य खात्यात कोणताही भ्रष्टाचार सहन करुन घेतला जाणार नाही. भ्रष्ट अधिकाऱयांना घरी पाठविले जाणार आहेत. गोमेकॉत काही कारकून व अन्य सरकारी अधिकारी रुग्णांकडून टोकन घेतात ते बंद केले जाणार आहे. तसेच अनेक वर्षे एकाच ठिकाणी असलेल्या कर्मचाऱयांची बदली करण्यात येणार आहे. याचा फायदा रुग्णांना मिळून सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध होणार आहेत, असे आरोग्यमंत्री म्हणाले.

108 मध्ये जीपीएस यंत्रणा बसविणार

108 सवेचा दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने सरकारने प्रयत्न चालविले आहे. सर्व 108 रुग्णवाहिकांमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यामुळे त्या रुग्णवाहिकेचा वेग आपल्याला कळेल. तसेच जुन्या रुग्णवाहिका बदलल्या जाणार आहेत. रुग्णवाहिकेअभावी कोणाचे प्राण जाणार नाहीत याची पूर्ण काळाजी घेतली जाणार आहे, असेही श्री. राणे यांनी सांगितले.

Related posts: