|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दांडीवासीयांची वीज वितरणला धडक

दांडीवासीयांची वीज वितरणला धडक 

मालवणमालवण शहरात गुरुवारी सकाळी नऊपासून दुपारी एकपर्यंत वीजपुरवठा खंडित असल्यामुळे शहरवासियांना प्रचंड उष्म्याचा त्रास सहन करावा लागला. वारंवार खंडित होणाऱया वीजपुरवठय़ामुळे अनेकांची विद्युत उपकरणे नादुरुस्त बनली होती. त्यामुळे मालवण शहरातील दांडी भागातील नारिकांनी वीज वितरणच्या कार्यालयावर धडक दिली. काँग्रेसच्या महिला उपतालुकाध्यक्षा चारुशिला आचरेकर व काँग्रेस कार्यकर्ते भाई मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली मालवण वीज कार्यालयावर धडक देत वीज अभियंता जालिंदर कुंभार यांना जाब विचारला. आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दांडीवासियांनी दिला.

  यावेळी चारुशिला आचरेकर, भाई मांजरेकर, मोहन वराडकर, संतोष केळुसकर, समीर केळुसकर, बाबा केळुसकर, सुदाम आचरेकर, नितीन आचरेकर, प्रसन्ना मयेकर आदी उपस्थित होते. चारुशिला आचरेकर म्हणाल्या, दांडी भागात होत असलेल्या कमी दाबाच्या व वारंवार खंडित होणाऱया वीजपुरवठय़ामुळे येथील अनेक नागरिकांचे फ्रीज, टीव्ही, विद्युत मीटर, पंखे, टय़ुबलाईट आदी उपकरणे खराब होऊन आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत गेली तीन वर्षे निवेदने व पत्राद्वारे लक्ष वेधूनही येथील वीज खांबांवर एक फेज वाढवून देण्याच्या मागणीबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यावर अभियंता कुंभार यांनी या कामासाठी वरिष्ठ पातळीवरून निधी उपलब्ध होत नसल्याचे कारण दिले. त्यावर भाई मांजरेकर यांनी नागरिकांच्या मागणीनुसार आपण वरिष्ठांकडे पाठवावा व यासाठी काँग्रेस नेते नारायण राणे यांचे लक्ष वेधून त्यांचेही पत्र या प्रस्तावास जोडून जिल्हा नियोजनमधून निधी मिळवून देण्यासाठी आपण सहकार्य करू, असे सांगितले.

 वायरी भूतनाथ येथे वाढत्या हॉटेल व्यवसायांमुळे येथील 100 केव्ही वीज ट्रान्सफॉर्मरची क्षमता कमी पडत आहे. त्यामुळे या ट्रान्सफॉर्मरद्वारे मोरेश्वरवाडी, रेवंडकरवाडी, जाधववाडी या भागात कमी दाबाचा वीजपुरवठा होतो आहे. त्यामुळे या ट्रान्सफॉर्मरची क्षमता 200 केव्ही करावी, अशी मागणी भाई मांजरेकर यांनी केली. मेढा येथील कचेरी रोड, चिवला बीच या भागातही कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त बनल्याचे यावेळी मोहन वराडकर यांनी सांगितले.