|Thursday, January 23, 2020
You are here: Home » क्रिडा » ज्योकोव्हिक-ग्रॅनोलर्स, मुगुरुझा-शियाव्होन सलामीच्या लढती

ज्योकोव्हिक-ग्रॅनोलर्स, मुगुरुझा-शियाव्होन सलामीच्या लढती 

ग्रँडस्लॅमचा ड्रॉ जाहीर, नादाल-जोकोव्हिक उपांत्य लढत होण्याची अपेक्षा

वृत्तसंस्था / पॅरिस

येत्या रविवारपासून सुरू होणाऱया फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचा ड्रॉ जाहीर करण्यात आला असून अपेक्षेप्रमाणे निकाल लागत राहिल्यास सर्बियाचा नोव्हॅक ज्योकोव्हिक व स्पेनचा राफेल नादाल यांच्यात उपांत्य फेरीत गाठ पडण्याची शक्यता आहे. महिलांमध्ये विद्यमान विजेती गार्बिन मुगुरुझा व 2010 ची फ्रेंच ओपन विजेती फ्रान्सेस्का शियाव्होन यांच्यात सलामीची लढत होईल.

जागतिक द्वितीय मानांकित व या स्पर्धेत दुसरे मानांकन मिळालेल्या ज्योकोव्हिकची सलामीची लढत 76 व्या मानांकित स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्सशी रविवारी होईल. जागतिक अग्रमानांकित ब्रिनटच्या अँडी मरेची या मोसमात क्लेकोर्टवरील कामगिरी निराशाजनक झाली असून त्याची सलामी रशियाच्या आंद्रेय कुझनेत्सोव्हशी होणार आहे. स्वित्झर्लंडच्या तिसऱया मानांकित स्टॅनिसलास वावरिंकाची पहिली लढत पात्रता फेरीतून आलेल्या खेळाडूंशी होईल आणि कदाचित उपांत्य फेरीत त्याला मरेशी मुकाबला करावा लागू शकतो. नऊ वेळा फ्रेंच स्पर्धा जिंकलेल्या नादालला पहिल्या फेरीत फ्रान्सच्या बेनोई पेअरशी मुकाबला करावा लागणार आहे. ज्योकोव्हिक व नादाल यांच्याकडून अपेक्षित कामगिरी झाली तर त्यांची उपांत्य फेरीत एकमेकांविरुद्ध गाठ पडू शकते.

नादालने क्लेकोर्टवर जबरदस्त कामगिरी केली असून या मोसमात त्याने आपल्या आवडत्या कोर्टवर सलग 17 सामने जिंकले आहेत. ज्योकोव्हिकला मात्र फॉर्म व आत्मविश्वास यासाठी संघर्ष करावा लागला असून त्याने अमेरिकेचा माजी टेनिसपटू आंदे ऍगास्सीची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या वषी येथे त्याने करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण केले होते. पण त्यानंतर त्याच्या फॉर्मला घसरण लागली आहे. विम्बल्डनमध्ये त्याला तिसऱया फेरीत तर रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच फेरीत तो पराभूत झाला होता. त्यानंतर अमेरिकन ओपनची अंतिम फेरी गाठली आणि ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुन्हा लवकर बाहेर पडावे लागले. याशिवाय त्याला अग्रमानांकनही गमवावे लागले. गेल्या 11 पैकी फक्त एका स्पर्धेत जेतेपद मिळविता आले आहे. फेडररने जानेवारीत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली. पण ग्रास व हार्ड कोर्टच्या तयारीसाठी त्याने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

महिलांमध्ये गार्बिन मुगुरुझा व फ्रान्सची शियाव्होन यांच्यात सलामीची लढत होईल. पहिल्या फेरीच्या अन्य सामन्यात जागतिक अग्रमानांकित अँजेलिक केर्बर व एकतेरिना माकारोव्हा, सिमोना हॅलेप व स्लोव्हाकियाची याना सेपेलोव्हा अशा लढती होतील. गेल्या डिसेंबरमध्ये चोराने केलेल्या चाकुहल्ल्यात जखमी झालेली झेकची पेत्र क्विटोव्हा पूर्ण तंदुरुस्त झाली असून तिचा मुख्य ड्रॉमध्ये समावेश करण्यात आला आहे. 27 वषीय क्विटोव्हाला 15 वे मानांकन मिळाले असून तिची पहिली लढत अमेरिकेच्या ज्युलिया बोसरपशी होईल. चाकू हल्ल्यानंतर तिने एकही स्पर्धात्मक सामना खेळलेला नाही. जुलैमध्ये होणाऱया विम्बल्डनमध्येही खेळणार असल्याचे तिने सांगितले आहे. सेरेना विल्यम्स व मारिया शरापोव्हा या स्पर्धेत खेळणार नसल्याने महिलांमध्ये कोणीही जिंकू शकेल, अशी स्थिती आहे. सेरेना गर्भवती असल्याने या स्पर्धेत खेळू शकणार नाही तर शरापोव्हाचे अपेक्षित मानांकन नसल्याने तिला या स्पर्धेत थेट प्रवेश मिळालेला नाही. याशिवाय स्पर्धा आयोजकांनी तिला वाईल्डकार्ड प्रवेश देण्यासही नकार दिला.

Related posts: