|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » नाटक हे विचार मांडण्याचं माध्यम

नाटक हे विचार मांडण्याचं माध्यम 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

नाटय़गृहातील 29 फूट लांबीचा रंगमंच म्हणजे केवळ एक जागा नसून, ते विचार मांडण्याचे ठिकाण आहे. दिग्दर्शकाच्या मनातील कलाकृतीला कलाकार आपल्या अभिनयाने मूर्त रुप देतो आणि एक विचार समाजामध्ये मांडला जातो. नाटक हे विचार मांडण्याचे माध्यम आहे. त्यामुळे नाटकातील अभिनय मला नेहमीच आनंद देतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते सागर तळाशीकर यांनी केले. भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रामध्ये मैत्र सांस्कृतिक मंचच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी झालेल्या मुक्त संवादात तळाशीकर यांनी आपला अभिनयाचा प्रवास उलगडला. ते म्हणाले, मालिका हे चरितार्थ चालण्याचे साधन आहे. चित्रपटात काम करणे आवडते पण नाटकात काम करण्याने आनंद मिळतो. नाटक हे केवळ मनोरंजनाचे व विचार मांडण्याचे साधन आहे. नाटय़गृहातील 29 फूट लांबीचे रंगमंच हे विचार मांडण्याचे ठिकाण आहे. लेखकाने मांडलेल्या विचार दिग्दर्शक आत्मसात करतो. त्याआधारे तो एक कलाकृती बनवतो. कलाकार त्या कलाकृतीला अभिनयाच्या माध्यमातून मांडतात. मग लेखकाने मांडलेला विचार समाजापर्यंत पोहोचतो. ‘कोपनहेगन’सारखी नाटके माणसाला विचार करण्यास प्रवृत्त करतात. त्यामुळे नाटकात भूमिका करण्याने नेहमीच आनंद मिळतो.

चित्रपट क्षेत्रातील बदलांबद्दल तळाशीकर म्हणाले, चित्रपट, नाटक यामाध्यमांत काम करणारी तरुण मुले अतिशय कल्पक आणि उत्साही आहेत. त्यामुळे चित्रपट आणि नाटकाच्या विषयांमध्ये वैविध्य पाहावयास मिळते. या पिढीकडून  शिकण्यासारखे आहे. अभिनयाचे प्रशिक्षण देणाऱया अनेक संस्था आहेत. मात्र, तुम्ही सजगपणे अभिनय करत गेलात तर त्यातील बारकावे लक्षात येतात. त्यातून अभिनयाचा दर्जा उंचावतो.

यावेळी नाटय़ लेखक आणि दिग्दर्शक हिमांशु स्मार्त, गायन समाज देवल क्लबचे संचालक श्रीकांत डिग्रजकर, मैत्र सांस्कृतिक मंचच्या शुभदा आठले आणि भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राचे व्यवस्थापक उमेश बुधले उपस्थित होते. 

Related posts: