|Monday, September 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » लष्कर-ए-तोयबाचे 20 दहशतवादी भारतात ?

लष्कर-ए-तोयबाचे 20 दहशतवादी भारतात ? 

दिल्लीत अतिदक्षतेचा इशारा : मुंबई-राजस्थान-पंजाबला देखील धोका

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था

लष्कर-ए-तोयबाचे 20-21 दहशतवादी भारतात दाखल झाल्याचे वृत्त आहे. हे दहशतवादी दिल्ली, मुंबई, राजस्थान किंवा पंजाबमध्ये लपून बसत आपल्या कटाला मूर्त रुप देऊ शकतात. गुप्तहेर यंत्रणांकडून मिळालेल्या या माहितीनंतर दिल्लीत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

दिल्ली पोलिसांच्या सूचनेत जिल्हा, मेट्रो आणि रेल्वे पोलीस विभागांना सतर्क करत त्यांना बाजार, धार्मिकस्थळे, मॉल, मेट्रो आणि रेल्वे स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यास सांगण्यात आले आहे.  अतिदक्षता बाळगत संशयास्पद व्यक्ती, गोष्टी आणि वाहनांवर करडी नजर ठेवणे आणि सखोल चौकशी करण्याची सूचना पोलीस स्थानकांना करण्यात आली आहे. लष्करचे दहशतवादी दिल्ली, मुंबई, राजस्थान किंवा पंजाबमध्ये लपून बसत हल्ले घडवून आणू शकतात असा संशय पोलिसांना आहे. मार्गदर्शक सूचनांमध्ये पोलीस अधिकाऱयांना तयारीची तपासणी करण्यासाठी मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राजस्थानमधील सुरक्षेत वाढ

निर्देश जारी झाल्यानंतर दिल्लीत सुरक्षा वाढविण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणी पीसीआरच्या 10 व्हॅन तैनात करण्यात आल्या असून यात नॅशनल सिक्युरिटी गार्ड, प्रशिक्षित चालक आणि कमांडो आहेत. राजस्थानात देखील दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱयानंतर सीमावर्ती क्षेत्र तसेच महत्त्वाच्या शहरांमधील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.