|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » एमएमआरसी म्हणते, सहकार्य करा

एमएमआरसी म्हणते, सहकार्य करा 

मेट्रो 3 प्रकल्पातील झाडांच्या कत्तलीवरून सुरू असलेले वादळ शमवण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने आता जनतेलाच जाहीर निवेदन केले आहे. मेट्रो 3 प्रकल्पाचे, झाडांच्या कत्तलीचे काम कायदेशीर असून, जनतेने या कामासाठी सहकार्य करावे, असे जाहीर निवेदन नुकतेच एमएमआरसीने केले आहे. या निवेदनावर सेव्ह ट्री या संस्थेने आक्षेप घेतला असून, कायद्याच्या चौकटीत काम करत असल्याचा एमएमआरसीचा दावा खोटा असल्याचा आरोप केला आहे.

मेट्रो 3 प्रकल्पात पाच हजार झाडे तोडली जाणार आहेत. यामुळे पर्यावरणाचा ऱहास होईल असे म्हणत काही पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयात, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण दोन्ही ठिकाणी एमएमआरसीच्या बाजूने निर्णय लागला आहे. मात्र त्यानंतरही झाडांच्या कत्तलीवरून वाद सुरूच आहे. न्यायालयीन लढाई सुरूच असून, दुसरीकडे पर्यावरणप्रेमी सेव्ह ट्रीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून चिपको आंदोलन करत आहेत. या आंदोलनामुळे झाडांच्या कत्तलीच्या कामात अडथळा निर्माण होत आहे, पण मेट्रो 3 च्या कामावरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे एमएमआरसीने या प्रकल्पात किती झाडे कापणार, किती झाडांचे पुनर्रोपन करणार आणि किती झाडे नवी लावणार यासह हे काम कसे कायद्याच्या चौकटीतच केले जात आहे, याची मांडणी जाहीर निवेदनात केली आहे.

संपूर्ण प्रकल्पात 1074 झाडे कापली जाणार असून, 17,727 झाडे पुनर्रोपीत केली जाणार आहेत. तर कापण्यात येणाऱया झाडांच्या मोबदल्यात 3,222 झाडे लावण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाने कामाला हिरवा कंदील दिल्याचेही नमूद करत याचिका निकाली काढल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी या कामासाठी सहकार्य करावे असे आवाहन एमएमआरसीने केले आहे.

सेव्ह ट्रीने या निवेदनावर आक्षेप घेतला आहे. कायद्याच्या चौकटीत काम होत असल्याचा दावा खोटा असून, सर्वोच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली नसून, आम्हाला उच्च न्यायालयाच्या समितीकडे दाद मागण्यास सांगितले आहे. त्यामुळे अशी दिशाभूल करू नये असे म्हणत सेव्ह ट्रीचे सदस्य झोरू बाथेना यांनी यावर आक्षेप घेतला आहे. यासंबंधी एमएमआरसीला नोटीस पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

 

Related posts: