|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नैसर्गिक वारसाच्या जतनासाठी निसर्ग प्रेमीतर्फे कुठ्ठाळीत निदर्शने

नैसर्गिक वारसाच्या जतनासाठी निसर्ग प्रेमीतर्फे कुठ्ठाळीत निदर्शने 

प्रतिनिधी / वास्को

कुठ्ठाळी ते चिखली पर्यंतच्या रस्ता रूंदीकरणासाठी झाडे कापण्यात आल्याने नैसर्गिक वारसाचे जतन व पर्यावरणाच्या रक्षणासाठी चिपको मुव्हमेंटच्या धर्तीवर निसर्ग प्रेमीनी काल सोमवारी सायंकाळी कुठ्ठाळी महामार्गावर एकत्र येऊन सरकारच्या निर्णयाविरोधात निदर्शने केली.

यावेळी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, हिस्टोरी हेरिटेज ऍक्शन ग्रुपचे अध्यक्ष प्रज्वल साखरदांडे, मनोज परब, तेजस पंडित, अलका दामले, कपिल कोरगांवकर व गोव्यातील इतर ठिकाणचे निसर्गप्रेमी उपस्थित होते.

कुठ्ठाळी ते चिखलीपर्यंतच्या महामार्ग रूंदीकरणासाठी या भागातील झाडे कापण्याचा घेतलेला निर्णय पर्यावरणासाठी घातक असून महामार्गावरील झाडे कापण्याविरोधात आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले. राज्य सरकारने जंगलतोड थांबवून वृक्षाची लागवड करण्यासाठी पर्याय निवडायला हवा होता. पर्यावरणाचे हित लक्षात घेऊन वृक्षतोड करण्यापूर्वी राज्य सरकारने रस्ता रूंदीकरणासाठी आराखडा तयार करायला हवे होते असे यावेळी कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी राज्य सरकारने झाडे कापून टाकण्याचा सपाटा लावलेला आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा नाश करणाऱया कृतीविरूद्ध नागरिकांनी एकत्रीत येणे काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  हा प्रश्न आपण विधानसभेत उपस्थित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सागितले.

कुठ्ठाळी ते चिखली पर्यंतच्या रस्ता रूंदीकरणासाठी सुमारे सहाशे झाडे कापण्यात आलेली आहेत. आपण विकासाच्या विरोधात नाहीत. मात्र झाडांची बेसुमार कत्तल, शेती व डोंगराच्या उत्खननामुळे पर्यावरणाचा नाश होत चालला आहे असे हिस्टोरी हेरिटेज ऍक्शन ग्रुपचे अध्यक्ष प्रज्वल साखरदांडे यांनी सांगितले. काही मोजक्याच जणांच्या फायद्यासाठी पेडणे ते काणकोण आणि मुरगाव ते सत्तरीपर्यंतचा गोव्याचा नैसर्गिक वारसा विध्वंस करण्याचे प्रयत्न सरकारने चालविले आहेत. याचा गोव्यातील पर्यटनावरही परिणाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्याची ओळख राखणे व तिचे संरक्षण करणे गरजेचे आहे. रस्ता रूंदीकरण व रेल मार्गाचे दुपदरीकरण हे काही मोजक्याच जणांच्या सोयीसाठी करण्यात येत असल्याचा आरोप मनोज परब यांनी यावेळी केला. यावेळी इतर मान्यवरांनीही सरकारच्या धोरणाविरोधात आपली मते व्यक्त केली.

Related posts: