|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सकाळी अटक वॉरंट, सायंकाळी रद्द

सकाळी अटक वॉरंट, सायंकाळी रद्द 

दिगंबर कामत यांच्या वकिलांची न्यायालयाकडे हमी, दिलगिरी व्यक्त

प्रतिनिधी/ पणजी

जायका प्रकरणात माजी मुख्यमंत्री तथा मडगाव मतदारसंघाचे विद्यमान  आमदार दिगंबर कामत गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर न राहिल्यामुळे त्यांच्या विरोधात  सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केला. नंतर लगेच कामत यांचे वकील सुरेंद्र देसाई यांनी पुढील तारखेला कामत न्यायालयात उपस्थित राहतील, अशी लेखी हमी दिली व न्यायालयाची दिलगिरी व्यक्त केली. नंतर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश इर्शाद आगा यांनी अजामीनपत्र अटक वॉरंट रद्द केला. यामुळे  अडचणीत आलेल्या दिगंबर कामत यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला.  

सलग तिसऱयांदा कामत न्यायालयात गैरहजर

गुरुवारी येथील जिल्हा सत्र न्यायालयात जायका प्रकरण सुनावणीला आले असता जायका प्रकरणातील मुख्य संशयित माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत तसेच त्यांचे वकीलही न्यायालयात हजर राहिले नाही. दिगंबर कामत सलग तिसऱयांदा न्यायालयात हजर राहिले नव्हते. न्यायालयाचा अवमान टाळण्यासाठी दिगंबर कामत यांच्या विरोधात अजामीनपत्र अटक वॉरंट जारी करण्यात आला होता. सकाळच्या वेळेत जायकाची तक्रार सुनावणीसाठी आली होती. यावेळी दिंगबर कामत किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. अजामीनपत्र अटक वॉरंट जारी होताच कामत यांच्या वकिलांनी संध्याकाळी सत्र न्यायालयात धाव घेतली आपली बाजू मांडताना कामत न्यायालयात का उपस्थित राहू शकले नाही याबाबत न्यायालयात बाजू मांडली. तसेच पुढील सुनावणीच्यावेळी दिगंबर कामत न्यायालयात उपस्थित राहतील याबाबत लेखी हमी दिली.

कामत मुख्य संशयित

जायकाला कंत्राट देण्यासाठी मोठय़ाप्रमाणात लाच घेतल्याचा आरोप तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चर्चिल आलेमाव यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात आणखीन काहीजणांची नावे पुढे आली होती. त्यांच्या विरोधात गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी  ऑगस्ट 2015 साली गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणात दिगंबर कामत हे मुख्य संशयित आहेत. 

कामत यांची अद्याप न्यायालयीन चौकशी नाही

जायका प्रकरणी गुन्हा नोंद केल्यानंतर तत्कालीन सार्वजनिक बांकाममंत्री चर्चिल आलेमाव यांना अटक करून नंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती.  सुमारे 1.031 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप कामत आणि इतर संशयितांवर करण्यात आला आहे.  जायका प्रकरणाला दोन वर्षे उलटून गेली तरी कामत यांची अद्याप न्यायालयीन चौकशी झाली नाही. दिगंबर कामत यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला असला तरी त्याला पोलिसांनी आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

Related posts: