|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 2 चिनी हेलिकॉप्टर्सची भारताच्या हद्दीत घुसखोरी

2 चिनी हेलिकॉप्टर्सची भारताच्या हद्दीत घुसखोरी 

3 महिन्यातील घुसखोरीची चौथी घटना

वृत्तसंस्था/  देहरादून

उत्तराखंडच्या चमोली जिह्याच्या बाराहोतीमध्ये चीनच्या 2 हेलिकॉप्टर्सनी घुसखोरी केल्याचे उघडकीस आले आहे. चमोली जिल्हा भारत-चीन सीमेनजीक असून भारताने याप्रकरणी चीनसमोर विरोध नोंदवू असे म्हटले आहे. मागील 3 महिन्यात चिनी लष्कराकडून भारतीय सीमेत घुसखोरी होण्याची चौथी घटना आहे.

दोन्ही चिनी हेलिकॉप्टर्स जवळपास 5 मिनिटे भारतीय सीमेत राहिली, त्यांनी बहुधा भारतीय भागांचे छायाचित्रण केले असावे किंवा टेहळणी करण्यासाठी आली असावीत असे अधिकाऱयांनी सांगितले. भारतीय हवाईदल याप्रकरणी चौकशी करत असून दोन्ही हेलिकॉप्टर चीनच्या झीबा सीरिजच्या लढाऊ चॉपर असल्याचे समोर आले आहे.

बाराहोती महत्त्वपूर्ण

बाराहोती हे ठिकाण उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्याला लागून आहे. येथे आयटीबीपी जवानांना शस्त्रास्त्र नेण्यास अनुमती नाही. 1958 साली चीन आणि भारताने बारहोतीच्या 80 किलोमीटरच्या भागात लष्कर पाठविणार नाही असे ठरविले होते. 1962 च्या युद्धातदेखील पीपल्स लिबरेशन आर्मी या भागात शिरली नव्हती. युद्धानंतर आयटीबीपी जवानांनी या भागात गस्त सुरू केली होती.

मागील वर्षीही घुसखोरी

मागील वर्षी 22 जून रोजी चीनच्या सैनिकांनी अरुणाचल प्रदेशात घुसखोरी केली होती. जून महिन्यात घुसखोरीची ही तिसरी घटना होती. पीपल्स लिबरेशन आर्मी ऑफ चायनाचे 50 सैनिक भारतीय हद्दीत दाखल झाले होते. आयटीबीपीचे जवान त्सो सरोवरानजीक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले असताना घुसखोरीचा हा प्रकार घडला होता.

चिनी सैनिकांनी त्याआधी 9 आणि 15 जून रोजी घुसखोरी केली होती.

भारत-चीनमधील वाद

भारत आणि चीनदरम्यान वादग्रस्त भाग 4000 किलोमीटरचा आहे. परंतु चीननुसार सीमावादाचे क्षेत्र फक्त 2000 किलोमीटरचे आहे. पाकिस्तानने पीओsकतील अक्साई चीनचा भाग चीनला सोपविला आहे. या मुद्यावर दोन्ही देशांदरम्यान अनेक टप्प्याची चर्चा पार पडली असली तरी कोणताही निष्कर्ष निघू शकलेला नाही.