ब्रिटनमध्ये मतदानाच्या प्रक्रियेला प्रारंभ
थेरेसा मे यांच्या भवितव्याचा निर्णय घेणार 5 कोटी मतदार : बेक्झिटची प्रक्रिया 19 जूनपासून
वृत्तसंस्था/ लंडन
बेक्झिटनंतर ब्रिटनच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडले आहे. सरकारला ठामपणे बेक्झिटची प्रक्रिया पूर्ण करता यावी, यासाठी पंतप्रधान थेरेसा मे यांनी देशात मध्यावधी निवडणूक घेण्याची घोषणा केली होती. एकूण 650 जागांसाठी मतदान झाले असून कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी 326 जागांवर विजय मिळवावा लागणार आहे. बेक्झिटची प्रक्रिया 19 जूनपासून सुरू होणार आहे.
मँचेस्टर आणि लंडनमध्ये अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ब्रिटनमधील राजकीय स्थिती बदलली आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांच्या वतीने भारतीय वंशाचे 56 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 2015 सालच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे 10 जण विजयी येत संसदेत पोहोचले होते. प्रीति पटेल, आलोक शर्मा, वीरेंद्र शर्मा आणि शैलेश वारा ही यातील काही महत्त्वाची नावे आहेत. ब्रिटनमधील मतदारांची संख्या जवळपास 5 कोटी एवढी आहे.
राजकीय पक्षांची स्थिती
ज्यावेळी थेरेसा यांनी निवडणुकीची घोषणा केली होती, त्यावेळी कॉन्झर्वेटिव्ह पार्टी आघाडीवर होती, परंतु दहशतवादी हल्ल्यानंतर चित्र काहीसे बदलले आहे. एका सर्वेक्षणानुसार कॉन्झर्वेटिव्ह पार्टीला 41.6 टक्के आणि लेबर पार्टीला 40.4 टक्के लोकांचे समर्थन मिळू शकते.
थेरेसांच्या विजयाचा दावा
ब्रिटिश संसदेत सध्या थेरेसा यांच्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाकडे बहुमत असून 2015 साली झालेल्या निवडणुकीत डेव्हिड कॅमेरून यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने 331 जागा जिंकल्या होत्या. अनेक सर्वेक्षण संस्था आता देखील थेरेसा यांचाच विजय होईल असा दावा करत आहेत.