|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » पोर्तुगालच्या विजयात रोनाल्डोचे दोन गोल

पोर्तुगालच्या विजयात रोनाल्डोचे दोन गोल 

वृत्तसंस्था / रिगा

फिफाच्या आगामी विश्व करंडक पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेतील येथे ब गटातील शुक्रवारी झालेल्या सामन्यात पोर्तुगालने लॅटव्हियाचा 3-0 अशा गोल फरकाने एकतर्फी पराभव केला. या सामन्यात पोर्तुगालचा हुकमी स्ट्रायकर रोनाल्डोने दोन गोल नोंदविले.

या सामन्यातील विजयामुळे आता पात्र फेरीच्या ब गटात पोर्तुगालचा संघ 6 सामन्यांतून 15 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. पोर्तुगालचा या गटातील हा सलग पाचवा विजय आहे. ब गटात आघाडीवर असलेल्या स्वित्झर्लंडने शुक्रवारच्या सामन्यात फेरोई आयलंडस्चा 2-0 असा फडशा पाडला. स्वित्झर्लंडने या गटात 18 गुणांसह पहिले स्थान राखले आहे.

शुक्रवारच्या सामन्यात  लॅटव्हियाच्या तुलनेत पोर्तुगालचा खेळ अधिक आक्रमक आणि वेगवान झाला. मध्यंतराला चार मिनिटे बाकी असताना रोनाल्डोने संघाचा आणि वैयक्तिक पहिला गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत पोर्तुगालने 1-0 अशी आघाडी घेतली होती. 63 व्या मिनिटाला रोनाल्डोने संघाचा आणि वेयक्तिक दुसरा गोल हेडरद्वारे नोंदविला. 67 व्या मिनिटाला आंद्रे सिल्वाने पोर्तुगालचा तिसरा गोल नोंदवून लॅटव्हियाचे आव्हान संपुष्टात आणले. या गटातील आता पोर्तुगाल आणि स्वित्झर्लंड यांच्यात पहिल्या स्थानासाठी लढत येत्या ऑक्टोबरमध्ये होणार आहे. पोर्तुगालच्या रोनाल्डोने विश्व करंडक पात्र फेरीच्या स्पर्धेत आतापर्यंत 11 गोल नोंदविले आहेत.

फ्रान्सचा पराभव

पुढील वर्षी रशियात होणाऱया फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत थेट प्रवेशाच्या फ्रान्सचा मार्ग शनिवारच्या सामन्यातील पराभवामुळे अधिक बिकट झाला आहे. शनिवारच्या सामन्यात स्वीडनने फ्रान्सचा नाटय़मयरित्या 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला.

या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते पण जादा कालावधीत ओला टोव्होनेनने निर्णायक दुसरा गोल करून फ्रान्सचे आव्हान संपुष्टात आणले. या सामन्यात 37 व्या मिनिटाला ऑलिव्हर गिरॉर्डने फ्रान्सचे खाते उघडले. मध्यंतराला दोन मिनिटे बाकी असताना जिमी डुमेझने स्वीडनला बरोबरी साधून दिली. या विजयामुळे अ गटात आता स्वीडन आणि फ्रान्स हे दोन्ही संघ प्रत्येकी समान 13 गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत. फ्रान्सचा आता या गटातील पुढील महत्त्वाचा सामना 31 ऑगस्टला हॉलंडशी होणार आहे. हॉलंडने पात्र फेरीतील सामन्यात लक्झमबर्गचा 5-0 असा दणदणीत पराभव केला.