|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पं.स.सदस्याच्या अपघाती मृत्यूनंतर तणाव

पं.स.सदस्याच्या अपघाती मृत्यूनंतर तणाव 

दोडामार्ग  : भाजपचे पदाधिकारी, आयी गावचे माजी सरपंच व दोडामार्ग पंचायत समितीचे सदस्य भरत कृष्णा जाधव (47) यांच्या दुचाकीला बेळगावहून भाजी घेऊन येणाऱया टेम्पोने वझरे तिठा येथे धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली.

भाजी व कोंबडीची भरधाव वेगाने वाहतूक करणाऱया या गाडय़ांचा बंदोबस्त करण्याऐवजी पोलीसच त्यांना पाठिशी घालतात, असा आरोप करून टेम्पो चालकाला तात्काळ अटक करण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. प्रथम रुग्णालयाच्या आवारातच दोडामार्ग पोलिसांना ग्रामस्थांनी घेराव घातला. नंतर दीड तास बांदा-दोडामार्ग मार्गावर रास्तारोको करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईक व ग्रामस्थांनी नकार दिला. त्यामुळे वातावरण तंग बनले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी टेम्पो चालकाला अटक करण्याची ग्वाही दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

आयी ग्रामपंचायतीचे बरीच वर्षे सदस्य व सरपंचपद भूषविणारे भरत जाधव  धडाडीचे कार्यकर्ते म्हणून परिचित होते. एक हरहुन्नरी, तळमळीचा कार्यकर्ता म्हणून दोडामार्ग तालुक्यात त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. मंगळवारी दुपारी पं. स. सदस्य लक्ष्मण नाईक यांच्यासमवेत सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन ते रात्री आठ वाजता दोडामार्गमध्ये दाखल झाले. त्यानंतर बराच वेळ दोडामार्गला राहिल्यानंतर रात्री सव्वादहाच्या दरम्यान दुचाकीने आयी गावच्या दिशेने जाण्यास निघाले. त्यांची दुचाकी वझरे-तिठा या ठिकाणी पोहोचली असता समोरून अशोक लेलँडचा भाजी भरलेला टेम्पो (के. ए. 22-बी 9596) भरधाव वेगाने आला व त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी वेगाने होती की जाधव दुचाकीवरून रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला व उजव्या पायाला प्रचंड इजा पोहोचली. अपघातात टेम्पोही उलटला. जाधव यांना प्रथम दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर म्हापसा-गोवा येथील आजुलो रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा, घेराव, रास्तारोको

दरम्यान, अपघात घडताच टेम्पो चालकाने घटनास्थळाहून पळ काढला. पोलीस उशिराने घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे संतापलेल्या आयी ग्रामस्थांनी भरत जाधव यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत दोडामार्ग-बांदा राज्य मार्गावरच रास्तारोको आंदोलन केले. तब्बल तीन तास रास्तारोको आंदोलन सुरू होते. टेम्पो चालकास अटक करण्याचे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. जाधव यांच्या निधनामुळे तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन भाऊ व पुतणे असा परिवार आहे.

शून्यातून प्रगती

दोडामार्गच्या एका टोकाला आयीसारख्या गावात गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या जाधव यांनी स्वतःच्या हिमतीवर लोकसंग्रह निर्माण केला. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने रस्त्यावर उभे राहणे, उपोषणे, आंदोलने करणे हा त्यांचा जणू स्थायीभावच झाला होता. त्यामुळे माटणे पंचक्रोशी नेहमीच त्यांच्या पाठिशी राहिली. सुरुवातीच्या काळात ग्रामपंचायत सदस्य, नंतर उपसरपंच, सरपंच पदावरून त्यांनी चार महिन्यांपूर्वी झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत खुल्या प्रवर्गात निवडून येण्याचा मान त्यांनी मिळवला. लोककल्याणासाठी सतत झगडताना या तरुण कार्यकर्त्याच्या निधनाचे वृत्त समजताच मोठय़ा प्रमाणात लोकांनी दोडामार्ग रुग्णालयात धाव घेतली.

पुतण्या दहावी उत्तीर्ण

झाल्यामुळे दोडामार्गला घेतले पेढे

तालुक्यात कोणतीही छोटी-मोठी समस्या निर्माण झाल्यास सर्वात प्रथम जर कोणी पोहोचत असेल, तर ते म्हणजे भरत जाधव. अण्णा या टोपण नावाने परिचित झालेले हे नेतृत्व प्रत्येकाला हवेहवेसे वाटणारे होते. मंगळवारी सिंधुदुर्गनगरीत जात असताना पुतण्या दहावीत उत्तीर्ण झाल्याचे कळताच त्यांनी दोडामार्गमध्ये आल्यावर पेढे घेतले होते. पेढे घेऊन घरी जात असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली.

साडेतीन तासानंतर आंदोलन मागे

भरत उर्फ अण्णांचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त समजताच सकाळपासून दोडामार्ग रुग्णालयात गर्दी होण्यास सुरुवात झाली. सकाळी आठच्या सुमारास रुग्णालय परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. नऊच्या दरम्यान पोलीस व ग्रामस्थांत शाब्दिक चकमक उडाली. टेम्पो चालकाला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी रुग्णालयाच्या आवारातच ग्रामस्थांनी पोलिसांना घेराव घातला. यावेळी पोलीस व कार्यकर्ते यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. त्यानंतर आंदोलनकर्ते अधिकच आक्रमक झाले. त्यांनी थेट दोडामार्ग-बांदा रस्त्यावरच आंदोलन केले. त्यामुळे दोन्ही बाजूला मोठय़ा प्रमाणात वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. साधारण साडेतीन तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी दोडामार्ग सभापती गणपत नाईक, जि. प. चे माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, जि. प. सदस्य राजेंद्र म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, दोडामार्ग नगराध्यक्ष संतोष नानचे, नगरसेवक चेतन चव्हाण, भाजप जिल्हा सरचिटणीस यशवंत आठलेकर, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, भाजप तालुकाध्यक्ष संदीप नाईक, काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष राजू निंबाळकर, प्रेमानंद देसाई, रंगनाथ गवस, गणेशप्रसाद गवस, शैलेश दळवी, राजू ठाकुर, संदीप गवस, चेतन चव्हाण, दिवाकर गवस, राजेंद्र प्रसादी, सुधीर पनवेलकर, सुधीर दळवी, राजू ठाकुर, संजय गवस, ऍड. सोनू गवस यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, मित्रपरिवार उपस्थित होता. बुधवारी सायंकाळी शोकाकूल वातावरणात आयी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.