|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » करिअर कसे निवडावे?

करिअर कसे निवडावे? 

दहावी, बारावी परीक्षेचा निकाल समजताच पुढे काय करायचं या विचारात पालक आणि विद्यार्थी संभ्रमात असतात. फक्त विद्यार्थ्यांचे मार्क पाहून कळत नकळत पालकांकडून चुकीचे निर्णय घेतले जातात. करिअर निवडताना फक्त गुणांचा विचार न करता मुलांची बुद्धिमत्ता, स्वभाव, आवड आणि क्षमता याचाही विचार करायला हवा.

प्रत्येक मूल जन्माला येताना 8 वेगवेगळी बुद्धिमत्ता आणि 9 वेगवेगळे स्वभाव घेऊनच जन्मतात. प्रत्येकामध्ये त्यांचे प्रमाण वेगवेगळे असल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा वेगळे असते. हे गुण प्रशिक्षण देऊन वाढवता येतात. करिअर निवडताना मुलांमध्ये कोणते गुण चांगले आहेत आणि त्यांचा स्वभाव कसा आहे याचा विचार करायला हवा. मुलांमध्ये कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता प्रबळ आहे हे ओळखण्यासाठी समुपदेशकाची मदत घेता येते. मात्र, त्या जास्त खर्चिक असल्याने सामान्य पालकांना त्या परवडणाऱया नसतात.

मुलांमध्ये कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता प्रबळ आहे हे ओळखण्याचा दुसरा मार्गही आहे. तो म्हणजे आपण आपल्या मुलाचे निरीक्षण करून त्याच्याशी चर्चा करून त्यांचे चांगले गुण आणि स्वभाव ओळखून त्यांना करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. पालकांनी बोलणे टाळायला हवे, मुलांना स्वत: निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहीत करायला हवे, ज्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि हाच आत्मविश्वास पुढे मुलांना यशस्वी होण्यासाठी मदत करेल.

दहावी, बारावी नंतर पुढील शाखा निवडण्यापूर्वी मुलांना त्यांची आवड, क्षमता काय आहे हे माहिती करून घेणे आवश्यक आहे. एकदा का त्यांना काय आवडते आणि त्यांची क्षमता काय आहे हे समजले की पुढील पायरी येते ती म्हणजे जे त्यांना आवडते त्याची समाजाला गरज आहे का आणि ते केल्याने त्यांना पैसा, मानसन्मान मिळू शकतो का हे पाहणे. जर समाजाला गरज असेल तसेच त्यांना पैसे आणि मानसन्मान ही मिळणार असेल तर निवडलेले करिअर हे त्यांच्यासाठी योग्यच आहे.

योग्य महाविद्यालय निवडताना…

दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाले की त्यानंतर महत्त्वाचा टप्पा असतो तो महाविद्यालय निवडीचा. या टप्प्यावर विद्यार्थ्यांचा पुरता गोंधळ उडतो. शिवाय महाविद्यालय निवडताना झालेली चूक ही परवडणारी नसते म्हणून तुम्हाला फायदेशीर ठरतील अशा काही टिप्स जाणून घेऊयात. ज्यामुळे योग्य ते महाविद्यालय निवडताना मदत होईल.

1) पर्याय कमी करा : खूप पर्याय उपलब्ध असतील तेव्हा सर्वात पहिले म्हणजे पर्यायांची संख्या कमी करा. यादी छोटी करा. त्यामुळे गोंधळ कमी होतो. आपल्या शाखेशी निगडीत असणाऱया महाविद्यालयांमधून 10 महाविद्यालयांची निवड करा. त्यातून आपल्या आवडीची 2-3 महाविद्यालये कोणती आहेत याचा विचार करून त्याआधारे पुढचा शोध घ्या.

2) कट ऑफ जाणून घ्या : आपल्या वरिष्ठ मित्रांशी, समुपदेशक किंवा पालकांशी बोला आणि आपण निवडलेली महाविद्यालये कुठल्या श्रेणीतली आहेत ते जाणून घ्या. या महाविद्यालयांमधील गेल्या वर्षीचा कट ऑफची माहिती घ्या. त्यावरून प्रवेश मिळण्याची शक्यता किती आहे हे लक्षात येईल.

3) माहिती गोळा करा : प्रत्येक महाविद्यालयांविषयी थोडी माहिती मिळवा. आपण ज्या शाखेत प्रवेश घेणार आहोत तिथले वर्ग, प्राध्यापक, अभ्यासेतर उपक्रम, परदेशी विद्यापीठांशी संलग्नता किंवा इंटर्नशिपची संधी या साऱया गोष्टींचा थोडा अभ्यास करा. त्यानंतर महाविद्यालयाविषयीच्या योग्य आणि अयोग्य गोष्टी लिहून काढा.

4) महाविद्यालयातील सुविधा तपासा : महाविद्यालयाच्या नावा व्यतिरिक्त तिथला अनुभवही लक्षात घ्या. ज्यांची निवड केली आहे अशा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या, तिथल्या सुविधा, प्राध्यापक इतर कार्यक्रम, आजूबाजूचा परिसर किंवा त्या महाविद्यालयात आपल्या आवडीच्या काही गोष्टी आहेत का हे देखील तपासून घ्या.

5) खर्च तपासा : महाविद्यालयात पोहोचण्यासाठी आवश्यक असलेला प्रवास खर्च लक्षात घेतला पाहिजे. जर महाविद्यालय दुसऱया शहरात असेल तर तिथल्या राहण्याचा खर्चदेखील महत्वाचा मुद्दा ठरतो. त्यामुळे महाविद्यालयाचे स्थान, शहरीभाग आहे की निमशहरी, गावाकडचा परिसर आहे का हे देखील महत्वाचे आहे. तसेच महाविद्यालयांचे शुल्क जाणून घ्या.

या सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतर आपल्या पालकांशी याविषयी चर्चा करा आणि निर्णय घ्या. आर्थिक अडचण भासल्यास शैक्षणिक कर्जाचा पर्यायही उपलब्ध आहे, हेही लक्षात घ्या.

करिअरसाठी राज्य सरकार – विद्यापीठांमधील विविध पर्याय…

दहावी आणि बारावीचे निकाल लागले असून नेमके कोणते क्षेत्र निवडावे? सद्यस्थितीत कोणत्या कोर्सेसना जास्त मागणी आहे? पुढे जाऊन त्यात निर्माण होणाऱया संधी कोणकोणत्या आहेत? आपल्या आवडी-निवडी कुठल्या क्षेत्राशी मिळत्या-जुळत्या आहेत? आपली आवडच आपले करिअर होऊ शकेल का? असे अनेक प्रश्न अशा काळात पडणं योग्य आणि साहजिक आहे.

दिवसेंदिवस नवनवीन अभ्यास शाखा उदयास येत आहेत. त्यानुसार करिअर निवडताना बारकाईने आपला कल नेमका कोणत्या दिशेला आहे हे तपासणे महत्वपूर्ण आहे. शहरातील तरुणांना समुपदेशन किंवा करिअर मार्गदर्शन पेंद्रांच्या माध्यमातून माहिती उपलब्ध होत असते. पण, बहुतांशी ग्रामीण तरुणांना करिअरचा मार्ग निवडताना अनेक अडथळे येत असतात. दहावी किंवा बारावी नंतर कोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत याविषयी आज थोडं जाणून घेऊया…

विज्ञान शाखेतील अभ्यासक्रम

बीएसस्सी – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, संगणक, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, वनशास्त्र, आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ, गफह विज्ञान, कृषी विज्ञान, उद्यानविद्या, रेशीम उत्पादन, समुद्रशास्त्र, मानववंशशास्त्र, न्यायवैद्यकशास्त्र, आहार, डेअरी तंत्रज्ञान, हॉटेल व्यवस्थापन, पॅशन डिझाईन, मल्टिमीडिया, थ्रीडी ऍनिमेशन

वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रम

सनदी लेखापाल, मूल्य व्यवस्थापन, सीएस (कंपनी सचिव), बी. कॉम (कर आणि
कर प्रक्रिया), बी. कॉम (प्रवास आणि पर्यटन), बी. कॉम (बँक व्यवस्थापन), बी. कॉम, बी.बी.ए, बी.बी.एम, आर्थिक व्यवस्थापन

कला शाखा

जाहिरात, अर्थशास्त्र, ललित कला, विदेशी भाषा, इंटेरिअर डिझायनर, पत्रकारिता, ग्रंथशास्त्र, शारीरिक शिक्षण, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, समाजसेवा, समाजशास्त्र

व्यवस्थापन संबंधी अभ्यासक्रम

व्यवसाय व्यवस्थापन, बँक व्यवस्थापन, इव्हेंट मॅनेजमेंट, रुग्णालय व्यवस्थापन, मानव संसाधन व्यवस्थापन, तर्कशास्त्र व्यवस्थापन

वैद्यकीय अभ्यासक्रम

एमबीबीएस, बीएएमएस (आयुर्वेद), बीएचएमएस (होमिओपॅथी), बीडीएस

अभियांत्रिकी अभ्यासक्रम

बी.टेक अभियांत्रिकी, पेट्रो रसायन अभियांत्रिकी, पेट्रोलियम अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, यांत्रिक अभियांत्रिकी, वैमानिक अभियांत्रिकी, एरोस्पेस अभियांत्रिकी, कृषी अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल अभियांत्रिकी, सागरी अभियांत्रिकी, खनन अभियांत्रिकी, कापड अभियांत्रिकी

तंत्रनिकेतन अभ्यासक्रम

स्थापत्य अभियांत्रिकी, यांत्रिक अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल अभियांत्रिकी, संगणकशास्त्र अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी

असे विविध अभ्यासक्रम उपलब्ध असून त्यातून आपला कल आणि आवड यानुसार अभ्यासक्रम आपण निवडू शकता. तसेच यासंबंधी प्रशिक्षण संस्थांची निवड करतानाही विशेष काळजी घ्यावी, तज्ञांचा सल्ला घ्या. लवकरच करिअरचा मार्ग निश्चित करा. कारण हीच उज्ज्वल भविष्याची पायरी आहे.

Related posts: