|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » साहाय्यक फौजदारासह दोघे ‘लाचलुचपत’च्या जाळय़ात

साहाय्यक फौजदारासह दोघे ‘लाचलुचपत’च्या जाळय़ात 

प्रतिनिधी/ कवठे महांकाळ

कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याकडील साहाय्यक फौजदार चंद्रकांत अण्णाप्पा किल्लेदार वय 54, रा.जयश्री टॉवर, माळी थिएटरजवळ आणि पोलीस नाईक बाळासाहेब नाथा मगदूम वय 37, रा.लिंगनूर, ता. मिरज यांना पाचहजार रूपयांची लाचेची मागणी करताना मंगळवारी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या आवारात पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. लाचलुचपत प्रतिबंध खात्याने कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याकडील एकाचवेळी दोन पोलिसांना लाचप्रकरणी अटक करण्याची ही पहिलीच घटना आहे. या घटनेने पोलीस दलात प्रचंड खळबळ माजली आहे.

कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात एका मोटारसायकल अपघात प्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हय़ात आरोपीला मदत करण्यासाठी साहाय्यक फौजदार चंद्रकांत किल्लेदार व पोलीस नाईक बाळासाहेब मगदूम यांनी पाच हजार रूपयाची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी 31-05-2017 रोजी सांगली येथील लाचलुचपत खात्याच्या कार्यालयात तक्रार दिली. या तक्रारीत किल्लेदार व मगदूम यांनी पाच हजार रूपये मागितल्याचे सांगितले. त्यानुसार लाचलुचपत खात्याच्या कार्यप्रणालीनुसार पडताळणी केली. या पडताळणीमध्ये किल्लेदार आणि मगदूम यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.

मंगळवारी सकाळी लाचलुचपत खात्याचे उपअधीक्षक पी.पी.पाटील, पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे, हवालदार भास्कर भोरे, जितेंद्र काळे, शशिकांत कलगुटकी, सचिन कुंभार, बाळासाहेब पवार, सुनील राऊत, चंद्रकांत गायकवाड यांनी सापळा रचून कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या आवारात मागणी करण्याऱया साहाय्यक फौजदार चंद्रकांत किल्लेदार, पोलीस नाईक बाळासाहेब मगदूम यांना अटक करून त्यांच्यावर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

सहा महिन्यापूर्वी कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनमधील साहाय्यक फौजदार गुंडा पाटील यांना लाच घेताना रंगेहात पकडले होते. आज मंगळवारी चक्क दोन पोलिसांना लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दोन पोलिसांना लाच प्रकरणी अटक होण्याची कवठेमहांकाळ नव्हे तर सांगली जिह्यातील पहिलीच घटना असावी. किल्लेदार व मगदूम यांना लाचप्रकरणी अटक केलेनंतर पोलीस दलात प्रचंड खळबळ माजली आहे. मंगळवारी दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये लाचप्रकरणी दोघांना अटक केल्याची बातमी संपूर्ण तालुक्यात पसरल्यानंतर शासकीय कार्यालयातील कर्मचारी कार्यालयाबाहेर फिरत होते. या घटनेची चर्चा करीत होते.

कोणत्याही शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी शासकीय काम करीता लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंध कार्यालय सांगली येथे संपर्क साधावा असे आवाहन, लाचलुचपत प्रतिबंध खात्यातर्फे करण्यात आले आहे.