|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जिल्हय़ातील बंदरांचा व्यावसायिक विकास करा!

जिल्हय़ातील बंदरांचा व्यावसायिक विकास करा! 

वेंगुर्ले : सागरमाला योजनेतून सिंधुदुर्गातील जलवाहतूक व बंदरांचा व्यावसायिक विकास केल्यास पर्यटन, व्यापार, रोजगार, रो-रो बोटसेवेच्या माध्यमांचा विकास होईल. शेतकऱयांच्या शेती मालाचा वाहतूक खर्च कमी होऊन शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी पर्यटनासह रोजगार वृद्धीसाठी केंद्र शासनाने सागरमाला योजनेंतर्गत जलवाहतूक व बंदराच्या व्यावसायिक विकासास चालना द्यावी, अशी मागणी पेंद्रीय नौकानयन व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अ. भा. ग्राहक पंचायतीचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अतुल हुले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सागरमाला योजनेतून जिल्हय़ातील जलवाहतूक व बंदराचा व्यावसायिक विकास व्हावा म्हणून सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील सर्व घटकांना समावेश असा अहवाल हुले यांनी बनविला आहे. मुंबईतील ससून बंदर विकासासाठी सहा कोटी व वास्कोसाठी 140 कोटीची तरतूद केंद्र सरकारने केली आहे. त्याच धर्तीवर सागरमाला योजनेतून वेंगुर्ले, सर्जेकोट, देवगड या बंदरात बहुउद्देशीय जेटी विकासासाठी 200 कोटी मंजूर करावेत. मुंबई ते गोवा मार्गावर भाऊचा धक्का ते मालवण सात तासात अंतर कापणारी एअर कंडिशन कॅटमेरान प्रवासी बोट लवकरच सुरू होणार आहे. तिला प्रोत्साहन देण्यासाठी इंधनावर आयात, अबकारी व विक्री कर माफ करावा, भांडवली गुंतवणुकीसाठी सॉफ्ट लोन देऊन आयात कर माफ करावा, जागतिक स्पर्धेत ती टिकण्यासाठी कोकण किनारपट्टीतील शिपयार्ड व बंदरांना जहाजदुरुस्ती व बंकरिंग सेवेसाठी आवश्यक कर सुविधा दिली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

रो-रो बोटसेवेचा गोव्यापर्यंत विस्तार व्हावा!

सी ईगल कंपनीतर्फे ऑक्टोबरपासून पूझ पर्यटक बोटसेवा सुरू होत आहे. या बोटीस सर्जेकोट बंदरात गाळ असल्याने थांबा नाही. सर्जेकोट बंदराचा बहुउद्देशीय जेटी सागरमाला योजनेतून विकसित करण्यासाठी केंद्र शासनाच्या नौकानयन खात्यामार्फत व महाराष्ट्र शासनाच्या बंदर विकासाठी 10 कोटी मंजूर केलेले आहेत. या निधीचा विनियोग सर्जेकोट बंदर विकासासाठी करावा. भाऊच्या धक्क्याप्रमाणे बहुउद्देशीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रवासी टर्मिनल म्हणून विकास केल्यास ऑक्टोबरपासून सुरू होणारी प्रुझ बोटही येथे थांबेल. तेथे मच्छीमारी नौका, प्रवासी बोट सेवा आदींची सोय हवी, एकावेळी 25 व्होल्वो, 50 टुरिस्ट टॅक्सी यांच्या पार्किंगची सोय हवी, त्यादृष्टीने मेरीटाईम बोर्डाला त्वरित प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना द्याव्यात. सिंधुदुर्गसह महाराष्ट्रात विक्रमी शेती मालाचे उत्पादन होऊनही त्यांना भाव मिळत नाही. दुबईतील शेतमालाची प्रचंड मागणी भागाविण्यासाठी नाशिक ते गडचिरोलीपासून विमानाने शारजा-दुबईला शेतीमाल निर्यात होतो. वेंगुर्ले, विजयदुर्ग, जयगड येथे शेतमाल खरेदी विक्री केंद्रांची निर्मिती करून बंदरातून थेट दुबईला फॉस्ट कॅटमॅरॉन बोटसेवा सुरु केल्यास कोकण, पुणे पश्चिम, महाराष्ट्र, बेळगाव, हुबळी येथील फळे, दुग्ध, शेतीमाल निम्म्या किंमतीत दुबईला निर्यात होऊन शेतकऱयांचा फायदा होईल. केवळ भारतात नाही तर दक्षिण आशियातील पहिली रो-रो बोटसेवा सुरू करण्याचा मान कोकण किनारपट्टीला मिळाला आहे. रो-रो बोटसेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय नौका नयन खात्यातर्फे सागरमाला योजनेंतर्गत 45 कोटी मंजूर झाले आहेत. याच रो-रो बोटसेवेचा सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत विस्तार करून वेंगुर्ले, सर्जेकोट, देवगड येथे लॉजिस्टिक पार्क विकसित करून पश्चिम महाराष्ट्र बेळगाव येथील माल निम्म्या किंमतीत मुंबईत आणणे शक्य होणार आहे. सिंधुदुर्गच्या हजारो सुशिक्षित तरुणांना स्वतःच्या गावात हक्काचा रोजगार मिळावा, यासाठी हे प्रकल्प तातडीने पूर्णत्वास नेले जावे. गुजरात व उत्तरप्रदेशात सागरमालातून रो-रो बोटसेवा चालू केली. त्याचप्रमाणे ती मुंबई ते गोवा सुरू व्हावी यासाठी तरतूद करावी.

प्रवाळ बेटे विकसीत करा!

कोकणातील दीपगृह हे पर्यटकांसाठी महत्त्वाचे पॉईंट आहेत. या पॉईंटच्या ठिकाणी प्रवासी जेटी बांधणे व पर्यटक बोट सेवेला चालन देण्यासाठी 55 कोटीची तरतूद केलेली आहे. या योजनेतील वेंगुर्ले निवती रॉक दीपगृह येथे प्रवासी जेटी बांधणे, वेंगुर्ले बंदर ते निवती रॉक दीपगृह पर्यटक बोटसेवा चालू करून ती स्थानिक मच्छीमारांना चालविण्यात द्यावी. वेंगुर्ले रॉक येथे प्रवाळ बेटे विकसीत करावी. त्या ठिकाणी स्कूबा ड्रायव्हींग व स्नॉर्कलिंकचे परवाने प्रशिक्षण घेतलेल्यांना द्यावेत. सागरमाला यूएनडीपी योजनेतून मॉरिशसप्रमाणे ग्लास बोटी उपलब्ध करून पर्यटन विकासास चालना द्यावी. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या परिपूर्ण विकासाबरोबरच शेतीमाल, व्यापार वाहतूकदृष्टय़ा फायदे होणार असल्याचे हुले यांनी म्हटले आहे.