|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » वेळास-बाणकोट रस्त्यावरही उधाणाचे पाणी

वेळास-बाणकोट रस्त्यावरही उधाणाचे पाणी 

प्रतिनिधी/ मंडणगड

 तालुक्यातील बाणकोट-बांगमांडला पुलाच्या कामामुळे सध्या दुरवस्था झालेल्या वेळास-बाणकोट मार्गावर रविवारी समुद्राच्या उधाणाचे पाणी पोहोचले. यामुळे माती व मैला रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

 वेळास-बाणकोट रस्त्याची सध्याची स्थिती पाहता तो वाहतुकीसाठी योग्य राहिलेला नसल्याने वेळास मार्गावर चारचाकी वाहने चालवण्यास धोका उत्पन्न झाल्याने नागरिकांना पायी प्रवास करावा लागत आहे. बाणकोट-वेळास मार्गाच्या रक्षणासाठी धूप प्रतिबंधक बंधारा व रस्ता दुरुस्तीच्या उपायांकडे बांधकाम व पतन विभागाने यंदा दुर्लक्ष केल्याने या गावाचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटण्याचा धोका उत्पन्न झाला आहे.

 झाडाची फांदी तुटून वाहतूक कोंडी

बाणकोट-भोर-पंढरपूर राज्य महामार्गावरील भिंगळोली येथील शासकीय विश्रामगृहाजवळ सुरुच्या झाडाची मोठी फांदी रस्त्यावर पडल्याने रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद झाला. ही घटना रविवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली. बांधकाम, महसूल, वीज महावितरण खात्याने याची दखल लगेच घेतल्याने मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला झाला. झाडाच्या फांदीबरोबर झाडाजवळ असलेली विजेची लाईनही खाली आल्याने वीज पुरवठा खंडित झाला.

  या बाबत महावितरण कार्यालयात कळवताच महावितरण कर्मचाऱयांनी तत्काळ वीज पुरवठा बंद केला. त्यानंतर सार्वजनिक बांधकामचे अभियंता संदीप मिसाळ यांना कळवताच त्यांनी जेसीबी पाठवला. झाडाची फांदी मोठी असल्याने आणि ती विजेच्या तारांवर पडल्याने विजेच्या तारा तुटून विजेचा पोल खाली येण्याच्या भीतीने झाड जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यास अडसर निर्माण होत होता. अखेर स्थानिकांच्या मदतीने कटर मशीनच्या सहाय्याने फांदीचे तुकडे करून दोन अडीच तासांच्या अथक प्रयत्नाने रस्ता खुला करण्यात आला.

सुदैवाने मोठा अपघात टळला

  दरम्यान, या कालावधीत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहतूक कोंडी झाली होती. मदतकार्यात स्थानिकांसोबत महसूल, महावितरण, वनविभाग, सार्वजनिक बांधकामच्या कर्मचाऱयांनी मेहनत घेतली. घटनास्थळावरुन स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, झाडाची फांदी मोडून पडण्यागोदर काही क्षणापूर्वी एस. टी. बस त्या ठिकाणाहून पास झाली. त्यामुळे सुदैवाने एक मोठा अपघात टळला.