|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फोंडा शहरासाठी वाहतूक व्यावस्थापनाला प्राधान्य

फोंडा शहरासाठी वाहतूक व्यावस्थापनाला प्राधान्य 

प्रतिनिधी/ फोंडा

फोंडा शहरासाठी वाहतूक व्यावस्थापन आराखडा, उड्डाण पूल व ट्रक टर्मिनस या गोष्टींना प्राधान्य देऊन त्या लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी कुंडई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. कुंडई पंचायत क्षेत्रातील शेतकऱयांना माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे खत वाटपाच्या कार्यक्रमानंतर मंत्री ढवळीकर यांनी हा वार्तालाप केला.

फोंडा शहरात सध्या वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून वाहतूक व्यवस्थापन आराखडा गरजेचा आहे. या वाहतूक आराखडय़ाला जोडून गरज भासल्यास शहरात उड्डाण पूल उभारण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. या उड्डाण पुलांसाठी एकूण तीन जागांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी एक पर्याय निवडला जाणार आहे. फोंडा येथील आल्मेदा हायस्कूल ते शांतीनगर मार्ग, शांतीनगर रस्ता ते नगरपालिका किंवा फोंडा पालिकाकडून ढवळी बगलरस्त्याला जोडणारा मार्ग असे हे तीन पर्याय विचाराधीन आहेत. फोंडा तालुक्यात चार औद्योगिक केंद्रे असल्याने याठिकाणी मोठय़ाप्रमाणात मालवाहू ट्रकांची रहदारी असते. देशभरातून वाहतूक करणाऱया या ट्रकांना फोंडय़ात पार्किंग व अन्य सुविधा उपलब्ध करणाऱया सुसज्ज ट्रक टर्मिनसला प्राधान्य देणार असल्याचे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले. कुर्टी पंचायत क्षेत्रात जागा मिळाल्यास लवकरच हा प्रकल्प हाती घेण्याचा विचार आहे. कदंब बसस्थानक परिसरात सरकारची 90 हजार चौ. मी. जागा आहे. या जागेत ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र व प्रशिक्षणासाठी वेगळा ट्रक तसेच वाहनांची तपासणी करण्यासाठी तांत्रिक प्रयोगशाळा हे अन्य प्रकल्पही विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.

फोंडा तालुक्यातील काही पंचायत क्षेत्रांमध्ये पाणी पुरवण्याची समस्या आहे. त्यावर मात करण्यासाठी येणाऱया काळात विशेष योजना कार्यान्वित होणार आहे. सांगे येथील 10 एमएलडी जलप्रकल्पातून फोंडा व तिसवाडीसाठी तसेच पंचवाडी येथील 15 एमएलडी व ओपा येथील 27 एमएलडी प्रकल्पातून फोंडा तालुक्यातील वेरे-वाघुर्मे, केरी, मडकई व अन्य भागात पाणी पुरवठा केला जाणार आहे. येत्या डिसेंबरपर्यंत ही योजना कार्यान्वित होणार असल्याची माहिती मंत्री ढवळीकर यांनी दिली.

कुंडई पंचायतीसाठी मैदान, मलनिस्सारण प्रकल्प व शेतीमधील गाळ उपसण्याच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कुंडईचे सरपंच रामू नाईक, उपसरपंच मोहन गावडे व इतर पंचसदस्य उपस्थित होते.

 

Related posts: