|Monday, September 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भारतानेच घुसखोरी केल्याचा चीनचा कांगावा

भारतानेच घुसखोरी केल्याचा चीनचा कांगावा 

सीमा ओलांडण्याचा भारतावरच केला आरोप : चीनने तोडले होते भारतीय सैन्याचे दोन बंकर्स

वृत्तसंस्था/ बीजिंग

भारतीय हद्दीत घुसखोरी करत तेथील दोन बंकर्स तोडल्यानंतर चीनने मंगळवारी भारतावरच आरोप केला आहे. भारतीय सैन्याने सीमा ओलांडल्याचा कांगावा करत सैनिक मागे घेतले जावेत अशी मागणी चीनने केली आहे. सीमेवरील वादामुळेच कैलास मानसरोवरला जाऊ इच्छिणाऱया भारतीय भाविकांसाठी नाथुला खिंडीचा मार्ग बंद केल्याचा दावाही चीनने केला आहे. सिक्कीममधील घटनेनंतर भारतीय सैन्याच्या घुसखोरीबाबत मुत्सद्देगिरीच्या स्तरावर निषेध नोंदविल्याचे चीनकडून सांगण्यात आले आहे.

आमचे क्षेत्रीय सार्वभौमत्व कायम राखण्याबाबत आम्ही कधीही तडजोड करणार नाही. भारत देखील याच दिशेने काम करत घुसखोरी केलेल्या जवानांना मागे बोलावून घेईल अशी अपेक्षा असल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी सांगितले आहे.

सुरक्षा कारणांमुळे प्रवेश नाही

नाथू ला खिंडीतून भारतीय भाविकांना जाऊ देण्याच्या मुद्याबाबत भारताला स्थितीची कल्पना देण्यात आली आहे. दीर्घकाळापासून चीनच्या सरकारने भारतीय भाविकांना आवश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु अलिकडेच भारतीय सैन्याने चीनच्या सीमेत शिरून आमचे बांधकाम नष्ट करण्याचा प्रयत्न केला. चीनने आवश्यक पावले उचलली असून सुरक्षेच्या कारणास्तव भाविकांना नाथू ला खिंडीत प्रवेश देणे बंद केल्याचा दावा कांग यांनी केला.

भारताच्या बंकर्सची केली होती तोडफोड

चीनला लागून असलेल्या सिक्किम सीमेवरील भारताचे दोन बंकर्स चिनी जवानांनी नष्ट केले होते. सीमेवर चीनच्या या दुष्कृत्याला भारतीय सैनिकांनी मानवी साखळी करून रोखले होते. घुसखोरीच्या या घटनेदरम्यान दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. डोका ला क्षेत्रात नोव्हेंबर 2008 मध्ये देखील पीएलएने घुसखोरी केली होती.