|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मराठवाडा-विदर्भातील शेतकर्यांच्या वीज जोडणीसाठी 1 हजार 200 कोटीचा निधी

मराठवाडा-विदर्भातील शेतकर्यांच्या वीज जोडणीसाठी 1 हजार 200 कोटीचा निधी 

प्रतिनिधी / लातूर

राज्य शासनाने मागील अडीच वर्षात मराठवाडा व विदर्भातील तीन लाख शेतकऱयांच्या कृषि पंपाच्या वीज जोडणीकरिता 1 हजार 200 कोटीचा निधी उपलब्ध करुन देऊन शेतकऱयांना दिलासा दिला आहे, असे प्रतिपादन ऊर्जा नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

महावितरणच्या अधिक्षक अभियंता कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित जिह्यातील सहा उपकेंद्राच्या भूमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी ऊर्जामंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार सर्वश्री सुधाकर भालेराव, विक्रम काळे, विनायक पाटील, त्र्यंबक भिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, महाराष्ट्र वीज वितरण मंडळाचे औरंगाबाद विभागाचे विभागीय संचालक ओमप्रकाश बकोरिया, महापौर सुरेश पवार उपस्थित होते.

ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले की, हे शासन सत्तेवर आल्यानंतर मराठवाडा व विदर्भातील 3 लाख शेतकऱयांच्या कृषि पंपाला वीज जोडणी नव्हती शेतकऱयांच्या कृषि पंपाला वीज दिल्याशिवाय शेतकऱयांची परिस्थिती सुधारणार नव्हती. त्यामुळे राज्य शासनाने या भागातील जवळपास तीन लाख शेतकऱयांना वीज जोडणी दिली असून त्याकरिता 1 हजार 200 कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

 मुख्यमंत्री कृषि वाहिनी योजनेंतर्गत राज्यात प्रत्येकी 800 ते 1 हजार शेतकऱयांच्या गटासाठी सौर उर्जेवरील कृषि फिडर देण्यात येणार असून त्यामुळे शेतकऱयांना दिवसाचे 12 तास सौर वीज उपलब्ध करुन देण्याचा विचार असल्याचे श्री.बावनकुळे यांनी सांगितले. राज्यातील शेतकर्यांकडे कृषी पंपाच्या विजेची सुमारे 22 हजार कोटीची थकबाकी असून लातूर जिह्याची 800 कोटीची थकबाकी असल्याचे सांगून सर्वांनी वीज देयके भरण्याचे आवाहन बावनकुळे यांनी केले.

लातूर जिह्यात महावितरणकडून 316 कोटी तर महापारेषणकडून 100 कोटीची कामे पुढील 2 वर्षात करण्यात येत आहेत. ह्या सर्व कामांवर नागरिकांनी व पदाधिकार्यांनी लक्ष ठेऊन दर्जेदार कामे करुन घेण्याच्या सूचना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी केल्या. दीनदयाल उपाध्यय योजनेंतर्गत लातूर तालुक्यातील लातूर, बोरगाव काळे, हादगळ, अहमदपूर तालुक्यातील खंडाळी, निलंगा तालुक्यातील शिरसिंहगरगा व औसा तालुक्यातील लोदगा येथील 33 के. व्ही. वीज उपकेंद्राचे भूमीपूजन संपन्न झाले असून हे सर्व काम संबंधीत गुत्तेदारांनी चांगले व दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले.

जिह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील विजेमुळे अपघात होण्याची शक्यता असलेली ठिकाणे शोधून त्याच्या शिफ्टींगच्या कामाचा आराखडा तयार करुन त्याकरिता जिल्हा नियोजन समितीकडून निधी घ्यावा, अशी सूचना बावनकुळे यांनी केली.

लातूर जिल्हा परिषदेने सर्व शाळा, अंगणवाडय़ा तसेच नळ योजनांसाठी सौर ऊर्जेचे प्रस्ताव दिल्यास त्यास तात्काळ मान्यता दिली जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. तसेच महावितरणाच्या अधिकारी व कर्मचाऱयांनी ग्राहकांची सेवा वेळेत व चांगली करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सर्वांनी मुख्यालयी राहिले पाहिजेत, असे निर्देश त्यांनी दिले.

   जिह्यातील 3 हजार पेक्षा अधिक लोकसंख्येची 365 गावे असून त्या गावांसाठी गावातीलच एका आय. टी. आय. झालेल्या उमेदवाराची यादी दिल्यास त्या सर्व गावांसाठी त्या 365 उमेदवारांची ग्रामदूत म्हणून नियुक्ती केली जाईल व नियुक्तीपूर्वी त्यांना सहा महिन्याचे प्रशिक्षणही दिले जाईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. जिह्यातील नागरिकांना वीज सेवा, वीज चोरी व अवैध दारु विक्रीबाबत तक्रारी थेट  कराव्यात असे आवाहन बावनकुळे यांनी केले. तसेच या सर्व तक्रारींना उत्तर दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

निलंगेकर म्हणाले की, महावितरणचे जिह्यात चांगले काम आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन दिलेला आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱयांना पाणी व वीज उपलब्ध झाल्यास शेतकरी एक ऐवजी दोन-तीन पिके घेऊ शकतात. यासाठी वीज वितरण कंपनीकडून सर्व पायाभूत सुविधा जिह्यात निर्माण झाल्या पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.प्रारंभी बावनकुळे यांनी निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली लातूर, बोरगाव काळे, खंडाळी, लोदगा, शिरसिंहरगा या उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. प्रास्ताविक अधिक्षक अभियंता सचिन तालेवार यांनी केले. या कार्यक्रमास जिह्यातील नागरिक व पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related posts: