|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » गाडगीळांच्या 33 कोटीच्या घोषणेतील दमडाही नाही

गाडगीळांच्या 33 कोटीच्या घोषणेतील दमडाही नाही 

प्रतिनिधी/ सांगली

सांगलीतील रस्त्यांसाठी 33 कोटींचा निधी आणल्याची घोषणा आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली. या रस्त्यांसाठी मनपाने दीड वर्षापूर्वी एनओसी दिली मात्र यातील रूपयाचाही निधी सार्वजनिक बांधकामकडे आला नाही. यामुळे रस्त्यांची कामे अडली असून कामे रखडून ठेवून निवडणुकीच्या तोंडावर कामे सुरू करून काँगेसची सत्ता घालविण्याचा डाव असल्याचे आरोप नगरसेवक व मदनभाऊ युवा मंचचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी केली आहे.

दीड वर्षापूर्वी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगलीच्या रस्त्यासाठी 33 कोटीचा निधी मंजूर केल्याची घोषणा केली होती. मनपा निधी आणि आमदार निधी यामध्ये वाद विवाद सुरू झाला होता. आमदारांनी नावासह रस्त्यांच्या कामाला मंजुरी आणल्याने मनपाला एनओसी द्यावी लागली होती. मात्र एनओसी देऊन वर्ष दीड वर्षे होत आले तरी अद्याप रूपयाही निधी आला नाही, असे सांगून नगरसेवक संतोष पाटील म्हणाले, नियमानुसार एनओसी वर्षच चालते आमदारांच्या कामातील एकाही रस्त्यांच्या कामाचे अध्याप टेंडरही निघाले नसल्याचे सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱयांनी तसे सांगितले आहे.

सध्या रस्त्यासाठी जनतेचे हाल सुरू आहे. मात्र भाजपा राजकारण करीत आहे. आमच्या नेत्यांनी अशा प्रकारचे कधीच जनतेच्या कामात राजकारण केले नाही. मात्र भाजपा, मनपा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱयांना मनपातील काँग्रेसची सत्ता जावी, यासाठी कामे अडवून ठेवली आहेत. निवडणूकीच्या तोंडावर कामे सुरू करून याचे भांडवल करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केल्याचा आरोप यावेळी संतोष पाटील यांनी केला.

 दरम्यान, याबाबत  त्यांनी शिष्टमंडळासह शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभाग मिरजच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले असून दीड वर्षापूर्वीची 33 कोटीच्या कामातील एकही काम अध्याप सुरू झाले नाही. एनओसीची मुदत संपलेली आहे. हा निधी परत जाण्याची शक्यता आहे. स्वार्थासाठी जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. शामरावनगरमधील रस्ते, लक्ष्मी देऊळ ते चैत्रबन नाला रस्ता, वसंत बंगला ते मंळवार बाजार, अहिल्यादेवी होळकर चौक ते मंगळवार बाजार, स्फुर्ती चौक ते मिरज रोड अशी अनेक रस्त्यांची कामे रखडली आहे. याबाबत तात्काळ निविदा काढून कामे सुरू करावीत अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी सतीश पवार, शेखर पाटील, ज्ञानू शेख, अमर निंबाळकर, अमोर झांबरे, नितीन चव्हाण, तौफीक कोतवाल, उमेश गुड्डी, प्रमोद उपाध्ये इर्शाद सोलापूरे आदी उपस्थित होते.