|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कर्जबाजारीपणामुळे क.डिग्रजमध्ये शेतकऱयाची आत्महत्या

कर्जबाजारीपणामुळे क.डिग्रजमध्ये शेतकऱयाची आत्महत्या 

प्रतिनिधी/ सांगली

शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निकषात बसत नसल्याने मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील मनोज बापूसाहेब पाटील (47) या शेतकऱयाने आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी तीन वाजता कसबे डिग्रज बंधाऱयावरून त्यांनी उडी मारली असून बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बंधाऱयाजवळ त्यांचा मृतदेह सापडला. सांगली ग्रामीण पोलिसात याची नोंद झाली आहे.

याबाबत नातेवाईकांकडून समजलेली माहिती अशी, मनाजे पाटील यांची डिग्रजमध्ये चार एकर वडिलोपार्जित शेती आहे. त्यांच्या वडिलांच्या नावे गावातील विकास सोसायटी आणि अन्य एका बँकेचे दीड लाखापर्यंतचे कर्ज आहे. वडील आठ वर्षापासून अर्धांगवायूच्या आजारामुळे अंथरूणावरच झोपून आहेत. शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या कर्जमाफीचे निकष लागू होत नसल्याने आपले कर्ज माफ होणार नाही. याची त्यांना चिंता लागली होती. त्याबद्दल ते गेल्या दोन-तीन दिवसांपासून बडबडतही असल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी दुपारी ते मौजे डिग्रज येथील पाहुण्यांकडे गेले होते. कर्जमाफीच्या निकषात आपण बसतो अथवा नाही याची त्यांनी पाहुण्यांकडे चर्चा केली. पण, पाहुण्यांनी कर्जमाफी होऊ दे अथवा राहुदे आपण 50 हजार देऊ, कर्ज फेडू, दीड लाख कर्ज म्हणजे फार मोठी रक्कम नसल्याचे सांगितले.

बुधवारी दुपारी तीन वाजता ते मौजे डिग्रजवरून कसबे डिग्रजला जाण्यासाठी निघाले. पण, रात्री उशीरापर्यंत ते घरी पोहोचलेच नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचा तपास लागला नाही. डिग्रज बंधाऱयावर चप्पल आणि सायकल ठेऊन नदीत उडी मारल्याचे सांगण्यात आले. बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात आला. वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर कसबे डिग्रजमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना एक मुलगी असून ती दहावीच्या वर्गात शिकत आहे. तर मुलगा महाविद्यालीयन शिक्षण घेत आहे. आजारी वडील, कर्जबाजारीपणा आणि संसाराचा गाडा ओढताना उडणारी तारांबळ यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांतून सांगण्यात आले.

सागर आप्पासो कुरूचे या मावस काकांनी सांगली ग्रामीण पोलिसात वर्दी दिली असून पाण्यात बुडून मयत झाल्याची नोंद करण्यात आली आहे.