|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महामार्गावरील कोगनोळी सेल्स टॅक्स नाका बंद

महामार्गावरील कोगनोळी सेल्स टॅक्स नाका बंद 

वार्ताहर /कोगनोळी :

देशात 30 जूनच्या मध्यरात्रीपासून जीएसटी करप्रणाली लागू झाल्याने रात्रंदिवस सुरु असणारा व एकही दिवस बंद नसलेला कोगनोळी येथील पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरील पाटील मळा फाटय़ानजीक असलेला सेल्स टॅक्स नाका आता बंद झाला आहे. त्यामुळे दरमहा गोळा होणारा 50 लाखाचा महसूल थांबला आहे.

 या सेल्स टॅक्स नाक्यावर दिवसभरात सुमारे 700 हून अधिक वाहने येत होती. तसेच दरमहा 50 लाखाच्या आसपास महसूल गोळा होत होता. या कार्यालयात 4 अधिकारी, लिपीक, शिपाई यांच्यासह 90 कर्मचारी काम करीत होते. आता या सर्व कर्मचाऱयांची बेळगाव व अन्यत्र बदली झाल्याचे सेल्स टॅक्स अधिकारी करेगौड यांनी सांगितले.

 कोगनोळी गावापासून काही अंतरावर असणाऱया या सेल्स टॅक्स नाक्यावर कायम वाहनांची मोठी गर्दी दिसत होती. महामार्गासह सेवा रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात येत होते. आता नाकाबंद झाला असून गर्दी नाहीशी झाली आहे. नाक्यावर थांबावे लागत नसल्याने मालवाहू वाहन चालकांतून समाधान व्यक्त होत आहे. 

व्यावसायिकांवर संक्रात

 कोगनोळी सेल्स टॅक्स नाक्यावर कागदपत्रे तपासणीसाठी दररोज शेकडो वाहने थांबत होती. याठिकाणी चहागाडी-हॉटेल्स, गाडय़ांचे पंक्चर, ग्रीस, झेरॉक्स, खाद्यपदार्थ विक्री अशा शेकडो व्यावसायिकांवर आता संक्रात आली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना रोजीरोटीसाठी अन्य पर्याय शोधावे लागणार आहे.

Related posts: